वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक काश पटेल यांची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध कंट्री सिंगर अॅलेक्सिस विल्किन्स यांनी एका माजी एफबीआय एजंटवर 50 लाख डॉलर्सचा (अंदाजे 40 कोटी रुपये) बदनामीचा खटला दाखल केला आहे.
एफबीआय संचालक काश पटेल यांना ‘हनीपॉट’ ऑपरेशनचा भाग म्हणून मोहजालात अडकवून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आपल्याला इस्रायलने पाठवले होते, असा खोटा आरोप पॉडकास्टर काइल सेराफिन यांनी केल्याचे विल्किन्स यांनी म्हटले आहे. अॅलेक्सिस विल्किन्स यांनी हा खटला टेक्सासच्या फेडरल कोर्टात दाखल केला आहे. सेराफिन यांनी आपल्या ऑनलाईन शोमध्ये विल्किन्स या ‘हनीपॉट’ आणि ‘मोसादच्या माजी एजंट’ असून पटेल यांना हाताळण्यासाठी काम करत असल्याचा दावा केला होता.
अॅलेक्सिस विल्किन्स या एक प्रसिद्ध कंट्री सिंगर असून त्या एफबीआय संचालक काश पटेल यांच्या गर्लफ्रेंड आहेत. जानेवारी 2023 पासून त्यांचे संबंध सुरू झाले. फेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पटेल यांची एफबीआय प्रमुखपदी निवड केल्यानंतर विल्किन्स यांनी दोघांचे एकत्र फोटोही पोस्ट केले होते.