परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. (Image source- @DrSJaishankar)
आंतरराष्ट्रीय

पाकव्याप्त काश्मीर परत घेतल्यानंतर काश्मीरचा मुद्दा सुटेल, एस. जयशंकर यांचे PoK संदर्भात विधान

S Jaishankar on PoK | कलम ३७० हटवणे हे एक पहिले पाऊल, आता...

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. पाकिस्तानने भारताचा जो भाग चोरलेला (PoK) आहे, तो आम्ही परत घेण्याची वाट पाहात आहोत. तो भाग भारतात सामील होताच जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्ण शांतता प्रस्थापित होईल, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये बुधवारी "जगात भारताचा उदय आणि भूमिका" या विषयावरील सत्रात बोलताना त्यांनी हे विधान केले.

एस. जयशंकर यांनी काश्मीर आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल भाष्य केले. त्यात कलम ३७० हटवणे, आर्थिक उपाययोजना आणि मतदानात लोकांचा सहभाग वाढवणे आदी मुद्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत डॉलरच्या वापराबद्दल ब्रिक्स देशांच्या मतांवरही त्यांनी यावेळी चर्चा केली.

काश्मीरबद्दल विचारले असता जयशंकर म्हणाले, "काश्मीरमधील बहुतांश समस्या सोडवण्याचे चांगले काम आम्ही केले आहे. मला वाटते की कलम ३७० हटवणे हे एक पहिले पाऊल होते. त्यानंतर, काश्मीरमध्ये विकास, आर्थिक उलाढाल आणि सामाजिक न्याय पुर्नस्थापित करणे हे दुसरे पाऊल होते. निवडणुकांमधील मतदानात लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवणे हे तिसरे पाऊल होते. मला वाटते की आम्ही ज्याची वाट पाहत आहोत तो म्हणजे पाकिस्तानने काश्मीरचा जो भाग चोरलेला आहे तो परत मिळवणे. जो बेकायदेशीरपणे पाकिस्तानच्या ताब्यात आहे. हा पाकव्याप्त काश्मीर परत मिळवल्यानंतर मी तुम्हाला खात्री देतो की काश्मीरचा मुद्दा सुटेल."

जयशंकर पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेतील प्रशासन बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहे. जे भारताच्या हिताशी सुसंगत असे आहे. त्यांनी असेही सांगितले की दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमती दर्शविली आहे.

आयात शुल्काबाबत एस. जयशंकर काय म्हणाले?

आयात शुल्काबाबत (टॅरिफ) जयशंकर म्हणाले की, गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. यानंतर आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आहेत. "आम्ही शुल्काबाबत (टॅरिफ) खुली चर्चा केली. त्या चर्चेनंतर द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमत झाली आहे," असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT