एवरेस्ट चढाई करताना एकदा तुम्ही हरवला की तुमचा मृत्यू अटळ असतो. जगातील या सर्वोच्च शिखरावर चढाई करताना अनेक गिर्यारोहक तसेच गिर्यारोहकांचे मार्गदर्शक शेर्पा यांनी जीव गमावला आहे. नुकतीच एक घटना या एवरेस्ट मोहिमेतून समोर आली आहे. यामध्ये एका शेर्पाने चमत्कार करुन दाखवला आहे. हा शेर्पा एवरेस्ट मोहिमेवर असताना हरवलेला ५७ वर्षीय शेर्पा ६ दिवसानंतर जीवंत सापडला आहे.
मानवी इच्छाशक्तीची कमाल दाखवणारी घटना
या अनुभवी शेर्पाचे नाव दावा शेर्पा उर्फ हिलरी शेर्पा असे आहे. ते मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आले आहेत. .विषेश म्हणजे कुटुंबीयांनी ते मृत पावले असे समजून त्यांच्या निधनाचे धार्मिक विधी देखील सुरू केले होते, मात्र गुरुवारी (४ जून २०२६) ते बर्फात घसरत आणि रांगत खाली येत असताना चमत्कारिकरित्या जीवंत आढळले. ही घटना मानवी इच्छाशक्तीची कमाल दाखवणारी ठरली आहे
२९ मे रोजी दावा शेर्पा हे एका परदेशी गिर्यारोहकाला सुरक्षित खाली आणत असताना कॅंप-३ च्या वर 'डेथ झोन' (Death Zone) मध्ये त्यांच्याकडील ऑक्सिजन संपला. अतिथंडी आणि थकव्यामुळे ते मागे राहिले, तर इतर गिर्यारोहक खाली बेस कॅम्पला पोहोचले. पण दावा शेर्पा पोहचले नाही. शोध घेवूनही सापडले नाहीत, हेलिकॉप्टरद्वारे शोधमोहीम राबवूनही दावा शेर्पा यांचा कुठेच पत्ता लागला नव्हता. त्यामुळे सर्वांनीच त्यांच्या जगण्याची आशा सोडली होती.
बर्फ चघळत आणि हिमगव्हाऱ्यातून बाहेर येत काढले ६ दिवस
ऑक्सिजन संपल्यानंतर ते एका खोल बर्फाच्या फटीत कोसळले होते. दोन दिवस तिथेच अडकल्यानंतर त्यांनी कशीबशी दोरी शोधली आणि वर आले. 'डेथ झोन' सारख्या अत्यंत धोकादायक ठिकाणी अन्न आणि पाण्याशिवाय टिकून राहण्यासाठी त्यांनी खिशातील काही चॉकलेट्स पाण्यात भिजवून खाल्ले आणि तहान भागवण्यासाठी थेट बर्फ चघळला. अतिथंडीत पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही ते दिवस-रात्र बेस कॅम्पच्या दिशेने सरपटत पुढे जात राहिले.
कचरा व्यवस्थापन टीममुळे वाचले प्राण
४ जून रोजी सकाळी 'सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समिती'चे (SPCC) काही कर्मचारी जेव्हा खुंबू आइसफॉल (Khumbu Icefall) जवळ स्वच्छता करत होते, तेव्हा त्यांना एक व्यक्ती बर्फावरून हळूहळू रांगत खाली येताना दिसली. त्यांनी तातडीने धाव घेत दावा शेर्पा यांना सुरक्षित ठिकाणी आणले. ६ दिवस अन्न, पाणी आणि ऑक्सिजनशिवाय एवरेस्टच्या थंडीत राहूनही ते केवळ जीवंत नव्हते तर पूर्णपणे शुद्धीत होते.
उपचार सुरु
काठमांडू येथील 'हॅम्स' (HAMS) रुग्णालयात सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. त्यांच्या हाताच्या बोटांना 'फ्रास्टबाईट' झाले असून पायाला गंभीर दुखापत आहे, मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. घरात ज्या व्यक्तीच्या मृत्यूचे विधी सुरू होते, ती व्यक्ती अचानक जीवंत असल्याचं समजताच त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. या चमत्कारिक सुटकेमुळे सध्या जगभरातील गिर्यारोहण क्षेत्रात दावा शेर्पा यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.