France Heatwave Deaths | हिट वेव्हमुळे फ्रान्समध्ये हजारहून अधिक मृत्यू; युरोपमधील १६ देशांत विक्रमी तापमान 
आंतरराष्ट्रीय

France Heatwave Deaths | हिट वेव्हमुळे फ्रान्समध्ये हजारहून अधिक मृत्यू; युरोपमधील १६ देशांत विक्रमी तापमान

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस/लंडन/माद्रिद; वृत्तसंस्था : युरोप सध्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून अनेक देशांमध्ये दशकांतील तापमानाचे विक्रम मोडले आहेत. फ्रान्समध्ये २४ ते २७ जूनदरम्यान भीषण उष्णतेमुळे सुमारे १,००० अतिरिक्त मृत्यू झाल्याची माहिती तेथील आरोग्य संस्थेने दिली आहे. मृतांपैकी सुमारे ८५ टक्के ज्येष्ठ नागरिक असून बहुतांश मृत्यू घरांमध्ये झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पॅरिस आणि आसपासच्या भागात परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून आले आहे.

जर्मनी, स्पेन, ब्रिटन, इटली, डेन्मार्क, स्वित्झर्लंडसह १६ युरोपीय देशांमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या अंदाजानुसार रविवारी युरोपमधील सुमारे १९.१ कोटी नागरिकांना ३५ अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक तापमानाचा सामना करावा लागला.

स्पेनमध्ये तापमान ४५ अंश पार

स्पेनमध्ये युरोपातील सर्वाधिक उष्णता अनुभवास येत असून एंडुजार येथे तापमान ४५.१ अंश सेल्सियसवर पोहोचले. गेल्या चार दिवसांत उष्णतेमुळे २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीतील ड्रॅविट्झ येथे ४१.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून तो देशाच्या इतिहासातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम ठरला आहे. उष्णतेमुळे महामार्गांवरील रस्ते वितळू लागल्याने काही मार्ग बंद करावे लागले. थंड डेन्मार्कमध्येही तापमान ३७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. १८७४ पासूनच्या नोंदींमधील हा सर्वाधिक तापमानाचा विक्रम आहे.

ब्रिटनमध्ये ५० वर्षांचा विक्रम मोडला

ब्रिटनमध्ये जून महिन्यातील ५० वर्षांचा उष्णतेचा विक्रम सलग तीन दिवस मोडला. दक्षिण इंग्लंडमध्ये तापमान ३६.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. उष्णतेमुळे वीजेची मागणी ४५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर गेली असून उष्माघात, निर्जलीकरण, श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT