नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील तणावाची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. या दरम्यान इलॉन मस्क यांना भारताने सुखद धक्का दिला आहे. इलॉन मस्कच्या स्टारलिंक कंपनीला भारतात उपग्रह (सॅटेलाइट) इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवाना मिळाला आहे. भारत सरकारकडून परवाना मिळवण्यासाठी मस्क यांच्या कंपनीचे प्रयत्न सुरु होते. भारतात इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या दिशेने स्टारलिंकसाठी हा महत्वाचा टप्पा आहे.
युटेलसॅट वनवेब आणि जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्सनंतर स्टारलिंक ही देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी दूरसंचार विभाग (डीओटी) कडून परवाना मिळवणारी तिसरी कंपनी आहे. दूरसंचार विभागाच्या सूत्रांनी पुष्टी केली की, स्टारलिंकला परवाना मिळाला आहे. स्टारलिंकला इंटरनेट सेवा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल. दूरसंचार विभागाने स्टारलिंकला लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) जारी केल्यानंतर जवळजवळ एक महिन्याने दूरसंचार विभागाकडून परवाना मिळाला आहे.
दरम्यान, स्टारलिंक ही कंपनी इलॉन मस्क यांनी स्थापन केलेली एक उपग्रह इंटरनेट सेवा देणारी आहे. ती उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरात वेगवान इंटरनेट सेवा प्रदान करते. स्टारलिंक भारतात ८४० रुपयांमध्ये एका महिन्यासाठी अमर्यादित डेटा प्रदान करेल अशी शक्यता आहे. स्टारलिंकसह उपग्रह संप्रेषण कंपन्यांचे लक्ष्य त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढवणे आहे. मध्यम ते दीर्घकालीन कालावधीत ते १ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे कंपन्यांना स्पेक्ट्रमचा प्रचंड खर्च भरून काढण्यास मदत होईल.