स्टॉकहोम; वृत्तसंस्था : सर्वसामान्यतपणे वयाची साठी ओलांडली की म्हातारपण आले असे मानले जाते. मात्र विज्ञानाने हा समज मोडीत काढला आहे. मानवी शरीराची ताकद आणि फिटनेस वयाच्या 35 व्या वर्षांपासूनच कमी होण्यास सुरुवात होते. पस्तीशीनंतर शरीराची कार्यक्षमता नैसर्गिकरीत्या कमी होऊ लागते आणि वय वाढेल तसा हा वेग वाढत जातो. त्यामुळे म्हातारपणाची चाहूल साठीत नाही, तर पस्तीशीतच लागत असल्याचे वास्तव स्वीडनमधील प्रतिष्ठित ‘कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट’ च्या एका दीर्घकालीन अभ्यासातून समोर आले आहे.
पस्तीशी ओलांडल्यानंतर मानवी शरीरात अनेक सूक्ष्म पण महत्त्वपूर्ण बदल घडू लागतात. स्वीडिश अभ्यासाने अधोरेखित केल्यानुसार, या वयानंतर स्नायूंचे वस्तुमान आणि त्यांची ताकद नैसर्गिकरीत्या कमी होऊ लागते. शरीराची ऑक्सिजन वापरण्याची क्षमता आणि चयापचय क्रिया मंदावल्यामुळे पूर्वी सहज वाटणारी कामे करताना दमछाक होऊ शकते किंवा लवकर थकवा जाणवू लागतो. हाडांची घनता कमी होणे आणि लवचिकता घटणे हे देखील म्हातारपणाकडे झुकण्याचे सुरुवातीचे संकेत आहेत. थोडक्यात सांगायचे तर 35 व्या वर्षांनंतर शरीर ‘ग्रोथ मोड’मधून हळूहळू बाहेर पडून ‘डिक्रीझिंग मोड’कडे वळते.
हे निष्कर्ष तब्बल 47 वर्षे चाललेल्या एका अत्यंत विस्तृत संशोधनातून समोर आले आहेत. ‘स्वीडिश फिजिकल अॅक्टिव्हिटी अँड फिटनेस’अंतर्गत शेकडो स्त्री-पुरुषांचा तब्बल पाच दशके अभ्यास करण्यात आला. यात 16 ते 63 वयोगटातील लोकांच्या स्नायूंची ताकद, फिटनेस आणि तग धरण्याची क्षमता यांचे निरीक्षण नोंदवण्यात आले. यामुळे हा अभ्यास वैद्यकीय जगात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
व्यायामामुळे तारुण्य टिकण्यास होते मदत
जरी पस्तीशीनंतर शरीराची ताकद कमी होत असली, तरी या अहवालात दिलासादायक बाबही समोर आली आहे. संशोधकांनी स्पष्ट केले की, व्यायामाला सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. अभ्यासातील ज्या लोकांनी प्रौढवयात किंवा उशिराने व्यायाम करण्यास सुरुवात केली, त्यांच्याही शारीरिक क्षमतेत 5 ते 10 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.