पुढारी ऑनलाईन डेस्क : Earthquake in Pakistan: पाकिस्तानमध्ये आज (दि. १२) दुपारी एकच्या सुमारास भूकंपाचे दोन तीव्र धक्के बसले. इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, उत्तर पाकिस्तानमधील अनेक शहरे हादरली. या अनेक भागात भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के काश्मीर खोऱ्यातही जाणवले.
प्राथमिक वृत्तानुसार पेशावर, मरदान, मोहमंद, स्वाबी, नौशेरा, लक्की मारवत, लोअर दिर, मलाकंद आणि शबकदर येथे भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, कोणत्याही प्रभावित भागातून जीवितहानी किंवा नुकसानीचे अद्याप वृत्त नाही. दुपारी १२:३० वाजता भूकपांचा पहिला धक्का जाणवला. यानंतर अर्धातासने दुसरासर्वात मोठा भूकंप झाला. याची तीव्रता तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी नाेंदली गेली आहे. या भूकंपाचे केंद्र रावळपिंडीपासून ६० किलोमीटर अंतरावर होते, ज्याची खोली फक्त १२ किलोमीटर इतकी कमी होती, असे वृत्त पाकिस्तानमधील 'Geo'न्यूजने दिले आहे.
राष्ट्रीय भूकंप निरीक्षण केंद्र (एनएसएमसी), पीएमडी इस्लामाबादनुसार, भूकंप दुपारी १२:३१ वाजता झाला, त्याची तीव्रता ५.५ आणि खोली १२ किलोमीटर होती. भूकंपाचे केंद्र रावळपिंडीच्या वायव्येस ६० किलोमीटर अंतरावर, अक्षांश ३३.९० उत्तर आणि रेखांश ७२.६६ पूर्व येथे होते.
याआधी २ एप्रिल रोजी पहाटे २:५८ वाजता पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता. यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ होती. अलिकडेच म्यानमार आणि बँकॉकमध्ये भूकंपाचा मोठा तडाखा बसला आहे.