डॉ. संतोष काळे
अनेकदा तीव्र कानदुखी सुरू झाल्यावर आपण कानात तेल किंवा थेंब टाकतो किंवा हा नेहमीचा संसर्ग (इन्फेक्शन) असेल असा अंदाज लावतो. परंतु, प्रौढ व्यक्तींमधील तब्बल ५० ते ६० टक्के कानदुखीची कारणे कानात नसून शरीराच्या इतर भागांत दडलेली असू शकतात. या वैद्यकीय स्थितीला ‘रिफर्ड ओटाल्जिया’ म्हणजेच ‘परावर्तित कानदुखी’ म्हणतात. आपल्या कानाच्या अगदी समोर खालचा जबडा आणि कवटी एकत्र जोडणारा एक महत्त्वाचा सांधा असतो, ज्याला ‘टेम्पोरोमँडिब्युलर जॉईंट’ म्हणतात.
रात्री झोपेत दात खाणे (ब्रक्सिझम), सतत कडक पदार्थ चावणे किंवा मानसिक ताणामुळे जबड्याच्या स्नायूंवर प्रचंड दाब येतो. या सांध्याला आणि कानाला ‘ट्रायजेमिनल’ नावाच्या एकाच मज्जातंतूद्वारे रक्तप्रवाह आणि संवेदना पुरवल्या जातात. त्यामुळे जबड्याच्या सांध्यातील सूज मेंदूकडे जाताना रुग्णाला कान आतून दुखत असल्याचा तीव्र भ्रम होतो. प्रत्यक्षात कान पूर्णपणे निरोगी असतो.
कानाचा पडदा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आतील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी कानापासून घशापर्यंत एक बारीक नलिका गेलेली असते, तिला युस्टेशियन ट्युब म्हणतात. कधीकधी या नलिकेच्या जवळील स्नायूंमध्ये अचानक पेटके येतात. याला ‘पॅलाटल मायोकलोनस’ म्हणतात. यामुळे कानात सतत टक-टक असा आवाज येतो आणि तीव्र कळा येतात. आपण विमानाने प्रवास करतो किंवा अचानक उंच ठिकाणी जातो, तेव्हा या नलिकेचे तोंड वेळेत उघडत नाही. परिणामी, मध्य कानात निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) तयार होऊन पडदा आत खेचला जातो. याला ‘बॅरोट्रॉमा’ म्हणतात आणि यामुळे असह्य वेदना होतात.
वयस्कर व्यक्तींमध्ये किंवा सतत संगणकावर काम करणार्या तरुणांमध्ये कानदुखीचे एक मुख्य कारण मानेच्या मणक्यात दडलेले असते. मानेच्या वरच्या भागातील मणक्यांमधून निघणार्या मज्जातंतू कानाच्या मागील भागाला संवेदना देतात. ’सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस’ किंवा मणक्यातील गादी सरकल्यास (डिस्क हर्निअशिन) या नसांवर दाब पडतो. हा दाब मानेत न जाणवता थेट कानाच्या पाठीमागे आणि आतमध्ये सुई टोचल्यासारख्या वेदना निर्माण करतो. जीभ, घसा आणि अन्ननलिका यांच्या संवेदना ‘ग्लोसोफॅरिंजिअल’ आणि ’व्हेगस’ या मज्जातंतूंद्वारे नियंत्रित होतात. याच नसा कानाच्या अंतर्गत भागालाही जोडलेल्या असतात.
खालच्या बाजूची अक्कलदाढ येताना होणारी सूज किंवा दातातील अंतर्गत पू (अॅबसेस) थेट कानात कळा निर्माण करतो. तीव्र अॅसिडिटीमुळे जठरातील आम्ल जेव्हा अन्ननलिकेच्या वरच्या भागापर्यंत येते, तेव्हा व्हेगस नर्व्ह उत्तेजित होते. यामुळे घशात जळजळ होण्याऐवजी अनेक रुग्णांना फक्त कानात तीव्र वेदना जाणवतात. जर कानदुखीसोबत ताप, कानातून पू येणे किंवा ऐकू न येणे अशी लक्षणे नसतील, तर कानात कोणतेही घरगुती तेल किंवा थेंब टाकू नका. अशा वेळी कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून घसा, जबडा आणि मानेची तपासणी करून घेणे आवश्यक असते.