Gold Rangoli : ६ किलो सोन्याची रांगोळी! सोन्याचे हार, बांगड्या अन् अंगठ्यांनी साकारली अनोखी कलाकृती file photo
आंतरराष्ट्रीय

Gold Rangoli : ६ किलो सोन्याची रांगोळी! सोन्याचे हार, बांगड्या अन् अंगठ्यांनी साकारली अनोखी कलाकृती

तब्बल ६.५ किलो सोन्यापासून साकारलेली अनोखी रांगोळी सध्या नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

पुढारी वृत्तसेवा

dubai 6-5 kg gold rangoli 213 jewellery pieces viral video

पुढारी ऑनलाईन : तब्बल ६.५ किलो सोन्यापासून साकारलेली अनोखी रांगोळी सध्या नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ही रांगोळी तयार करण्यासाठी सोन्याच्या २१३ दागिन्यांचा वापर करण्यात आला आहे. १० जणांच्या टीमने तब्बल १६ तास मेहनत घेऊन ही रांगोळी साकारली. बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या हस्ते या रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले. या शाही रांगोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दिवाळीच्या सणाला तुम्ही घराघरांत फुलांनी, रंगांनी आणि तांदळाने तयार केलेल्या सुंदर रांगोळ्या पाहिल्या असतील. मात्र, कधी सोन्याच्या दागिन्यांनी साकारलेली रांगोळी पाहिली आहे का? दुबईमध्ये अशीच एक अनोखी रांगोळी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे ही रांगोळी रंग किंवा फुलांनी नव्हे, तर चक्क सोन्याच्या दागिन्यांनी तयार करण्यात आली आहे. या रांगोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दुबईतील सिटी सेंटर डीरा येथे ६ नोव्हेंबर रोजी एका ज्वेलरी ब्रँडने ही खास सोन्याची रांगोळी लोकांसमोर सादर केली. बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या हस्ते या रांगोळीचे अनावरण करण्यात आले. ही अनोखी कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

६.५ किलो सोन्यापासून साकारली रांगोळी

ही रांगोळी तयार करण्यासाठी एकूण ६.५ किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. यासाठी सोन्याचे २१३ विविध दागिने आणि तुकडे एकत्रितपणे सजवण्यात आले. या संपूर्ण रांगोळीचा आकार साधारण २ बाय २ मीटर इतका आहे.

सामान्यतः रांगोळी काढण्यासाठी रंगीत पावडर, फुलांच्या पाकळ्या आणि तांदळाचा वापर केला जातो. मात्र, यावेळी या सर्व गोष्टींच्या जागी सोन्याच्या दागिन्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या आणि कानातल्यांचा समावेश होता. हे सर्व दागिने अत्यंत काळजीपूर्वक एका खास रचनेत सजवण्यात आले. रांगोळीच्या दोन्ही बाजूंना एकसारखी नक्षी आणि सणाशी संबंधित शुभचिन्हे साकारण्यात आली होती. त्यामुळे सोन्याच्या चमकदार दागिन्यांनी सजलेली ही रांगोळी अधिकच आकर्षक दिसत होती.

१० जणांनी १६ तासांत साकारली रांगोळी

इतक्या मोठ्या संख्येने सोन्याचे दागिने वापरून सुंदर रांगोळी तयार करणे हे सोपे काम नव्हते. यासाठी १० जणांची विशेष टीम तयार करण्यात आली होती. या टीममधील सदस्यांनी सलग सुमारे १६ तास मेहनत घेतली. प्रत्येक दागिना हाताने उचलून त्याला योग्य जागी व्यवस्थित ठेवण्यात आले. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने संपूर्ण रांगोळी साकारण्यात आली. तिचे सौंदर्य आणि सोन्याची झळाळी पाहून तेथे येणारे नागरिकही थक्क झाले.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या अनोख्या रांगोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पसंती मिळवत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण या कलाकृतीचे कौतुक करत आहेत. काही युजर्सनी रांगोळीला अतिशय सुंदर म्हटले आहे, तर काहींनी अशी रांगोळी केवळ दुबईमध्येच पाहायला मिळू शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने ही रांगोळी अप्रतिम असल्याचे म्हटले, तर दुसऱ्या युजरने ती पाहून आपण आश्चर्यचकित झाल्याचे सांगितले.

दुबईमध्ये सुरू आहे 'फेस्टिव्हल ऑफ लाईट्स'

ही खास सोन्याची रांगोळी दुबईमध्ये सुरू असलेल्या 'फेस्टिव्हल ऑफ लाईट्स'चा एक भाग आहे. दुबईच्या फेस्टिव्हल अँड रिटेल विभागाच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुबईमध्ये हा उत्सव १२ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात शहरात विविध सणांशी संबंधित कार्यक्रम आणि आकर्षक सजावट पाहायला मिळत आहे. सोन्यापासून साकारलेली ही रांगोळीही या उत्सवाचे खास आकर्षण ठरत आहे.

एकूणच, भारतातील पारंपरिक रांगोळीच्या कलेला दुबईमध्ये एक वेगळाच शाही साज चढवण्यात आला आहे. फुले आणि रंगांच्या ऐवजी सोन्याच्या दागिन्यांनी साकारलेल्या या रांगोळीने नागरिकांना अक्षरशः थक्क केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT