पुढारी ऑनलाईन डेस्क: सुदानमधील वेढलेल्या एल फाशेर शहरातील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे ७० जणांचा मृत्यू झाला. याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी रविवारी (दि.२६) सकाळी दिली.
सुदानच्या उत्तर दारफूर प्रदेशातील रुग्णालयावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात ७० हून अधिक लोकांचा मृत्यू आणि डझनभर जखमी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी शनिवारी सुदानमधील आरोग्यसेवा कर्मचारी आणि सुविधांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी X या सोशल प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये ही आकडेवारी दिली.
"सुदानमधील एल फाशेर येथील सौदी रुग्णालयावर झालेल्या भयानक हल्ल्यात १९ रुग्ण आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ७० जणांचा मृत्यू झाला," असे त्यांनी लिहिले. "हल्ल्याच्या वेळी, रुग्णालय उपचार घेणाऱ्या रुग्णांनी खचाखच भरलेले होते." स्थानिक अधिकाऱ्यांनी हल्ल्यासाठी बंडखोर रॅपिड सपोर्ट फोर्सला जबाबदार धरले असले तरी हा हल्ला कोणी केला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही, असे देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.