Doomsday Fish file photo
आंतरराष्ट्रीय

Doomsday Fish: महाप्रलय येणार? समुद्रकिनाऱ्यावर दिसले 'अशुभ' मानले जाणारे मासे; काय असतो संकेत? पाहा Video

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक महिलांना दुर्मिळ 'ओअरफिश' दिसले. समुद्राच्या अत्यंत खोलवर भागात राहणाऱ्या या माशांना स्थानिक भाषेत 'डूम्सडे फिश' म्हणतात.

मोहन कारंडे

Doomsday Fish:

मेक्सिको: मेक्सिकोमधील काबोस सॅन लुकास जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक महिलांना गेल्या आठवड्यात दुर्मिळ 'ओअरफिश' दिसले. समुद्राच्या अत्यंत खोलवर भागात राहणाऱ्या या माशांना स्थानिक भाषेत 'डूम्सडे फिश' म्हणतात. ओअरफिश किनाऱ्यावर दिसणे हे भूकंप किंवा त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत मानले जातात. म्हणूनच यांना 'प्रलयकारी मासे' असे देखील म्हटले जाते.

मोनिका पिटेंजर नावाच्या एका महिलेने आपल्या इन्स्टाग्रामवर या माशांचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने सांगितले की, "माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एखाद्या काल्पनिक चित्रपटात शोभावे असे ते दृश्य होते. सुरुवातीला आम्हाला पाण्यात लांबून काहीतरी चमकताना दिसले, पण जेव्हा तो मासा जवळ आला तेव्हा अत्यंत वेगळा असल्याचे लक्षात आले."

तिने पुढे सांगितले की, "त्यातील एक मासा किनाऱ्याला तडफडू लागला, तेव्हा माझ्या बहिणीने त्याला खोल पाण्यात ढकलण्यास मदत केली. त्यानंतर थोड्याच वेळात तिथेच दुसरा ओअरफिश दिसला, ज्यामुळे पर्यटकांमध्ये काहीशी भीती आणि कुतूहल निर्माण झाले होते." मोनिकाने सांगितले की, हे दोन्ही मासे यशस्वीरित्या पुन्हा खोल समुद्रात गेले. "आम्ही नंतर त्याबद्दल माहिती वाचली तेव्हा आम्हाला समजले की हा अनुभव किती दुर्मिळ आणि अंगावर शहारे आणणारा होता."

डूम्सडे फिश दिसणे अंधश्रद्धा की महाप्रलयाचे संकेत?

ओरफिश ज्याला 'डूम्सडे फिश' म्हणजेच 'प्रलयाचा मासा' म्हणून ओळखले जाते. हे नाव जपानी लोककथांमधून आले आहे. जपानमध्ये याला 'रुगु नो सुकाई' (समुद्र देवाच्या महालाचा दूत) म्हणतात. अशी श्रद्धा आहे की जेव्हा हे मासे समुद्राच्या पृष्ठभागावर येतात, तेव्हा ते भूकंप किंवा त्सुनामी येणार असल्याचे संकेत देतात.

शास्त्रज्ञ काय सांगतात?

शास्त्रज्ञांच्या मते, या माशांचा भूकंपाशी कोणताही थेट संबंध नाही. हे मासे सहसा समुद्राच्या अत्यंत खोलवर राहतात. मासा आजारी किंवा जखमी असणे, समुद्रातील प्रवाहांची दिशा बदलणे किंवा पाण्याचे तापमान बदलणे, मासा दिशाहीन होणे, ही मासे वर येण्याची मुख्य कारणे आहेत.

भारतातील समुद्रकिनाऱ्यावरही दिसला होता प्रलयाचा मासा

ओरफिश हा जगातील सर्वात लांब हाडांचा मासा आहे. याची लांबी ३० फुटांपेक्षाही जास्त असू शकते. याचा रंग चांदीसारखा चमकणारा असतो आणि शरीराचा आकार रिबीनसारखा चपटा असतो. त्याच्या डोक्यावर लाल रंगाचा तुरा असतो.

२०२५ च्या सुरुवातीला भारतात तमिळनाडू किनाऱ्यावर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये केवळ २० दिवसांच्या अंतरात हे मासे चार वेळा दिसले होते. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, परंतु संशोधकांनी स्पष्ट केले होते की हे केवळ पर्यावरणीय बदलांमुळे झाले असावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT