Donald Trump | शांतता करार न झाल्यास निर्णायक कारवाई : डोनाल्ड ट्रम्प  
आंतरराष्ट्रीय

Donald Trump | शांतता करार न झाल्यास निर्णायक कारवाई : डोनाल्ड ट्रम्प

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या शेवटच्या टप्प्यातील राजनैतिक वाटाघाटींमधून कोणताही शांतता करार झाला नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर पुन्हा नव्याने आणि भीषण लष्करी हल्ले करण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमेरिकेच्या ‘अ‍ॅक्सिओस’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी शुक्रवारी सकाळी व्हाईट हाऊसमध्ये आपल्या वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत इराणविरुद्धच्या युद्धाच्या पुढील रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली.

पाकिस्तान आणि कतारची मध्यस्थी

एकीकडे ट्रम्प लष्करी कारवाईचा इशारा देत असतानाच दुसरीकडे युद्ध रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर शेवटचे प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे सध्या तेहरानच्या दौर्‍यावर असून, शांतता करार घडवून आणण्यासाठी कतारचे एक शिष्टमंडळही त्यांच्यासोबत सामील झाले आहे.

ट्रम्प यांचा कौटुंबिक कार्यक्रम रद्द

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचे वीकेंडचे सर्व बेत रद्द केले आहेत. त्यांनी त्यांचा पूर्वनियोजित न्यू जर्सीचा दौरा रद्द केला. त्यांचे सुपुत्र डॉन ज्युनिअर यांच्या याच वीकेंडला होणार्‍या विवाह सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्रम्प युद्धात हारले?

या युद्धाचे दीर्घकालीन परिणाम राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी चिंताजनक ठरत आहेत. इराणचे आण्विक प्रकल्प, होर्मुझ समुद्रधुनीवरील नियंत्रण आणि तिथली सत्ता अजूनही कायम आहे. त्यामुळे अमेरिकेला या संघर्षातून कोणताही मोठा भूराजकीय फायदा मिळवता आलेला नाही, असे मत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

इस्रायलसोबत चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी मंगळवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा करताना राजनैतिक पर्यायाला आणखी एक संधी देण्याचे म्हटले होते. परंतु, गुरुवारी रात्रीपर्यंत वाटाघाटींमध्ये प्रगती न झाल्याने त्यांचा कल लष्करी हल्ल्यांकडे झुकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT