Donald Trump | इराणला लवकरच संपवणार 
आंतरराष्ट्रीय

Donald Trump | इराणला लवकरच संपवणार

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा; युद्ध लांबणार

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : इराण युद्धात आमची उद्दिष्टे पूर्णत्वाकडे गेलेली आहेत. आता लवकरच शेवटचा तडाखा देऊन इराणला संपवणार असल्याचा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या युद्धानंतर ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेले हे पहिलेच भाषण होते. इराणने नमती भूमिका न घेतल्यास युद्ध आणखी लांबणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

ट्रम्प यांनी दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधित करताना सांगितले की, येणार्‍या दोन ते तीन आठवड्यांत इराणवर अत्यंत भीषण प्रहार करण्यात येईल आणि काम अतिशय वेगाने संपवण्यात येईल. मात्र, हा संघर्ष नेमका कधी संपणार, याबाबत त्यांनी कोणतीही निश्चित कालमर्यादा जाहीर केली नाही.

आपल्या प्राईमटाईम भाषणात ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल आयात करणार्‍या देशांना धैर्य दाखवण्याचे आणि हा महत्त्वाचा जलमार्ग ताब्यात घेण्याचे आवाहन केले. युद्धाच्या सुरुवातीपासूनच इराणच्या हल्ल्यांमुळे हा मार्ग प्रभावीपणे बंद झाला आहे. व्हाईट हाऊसमधून दिलेल्या 20 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प म्हणाले की, अमेरिका या संघर्षातील आपल्या मुख्य धोरणात्मक उद्दिष्टांच्या पूर्णत्वाकडे पोहोचला आहे. अमेरिकेने इराणचे नौदल, ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शक्ती उद्ध्वस्त केली आहे, असा दावाही त्यांनी केला.

...तर ऊर्जा केंद्रांवर हल्ले

येत्या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर अत्यंत भीषण प्रहार करणार आहोत, असे ट्रम्प म्हणाले. जर कोणताही समझोता झाला नाही, तर आम्ही त्यांच्या प्रत्येक वीजनिर्मिती केंद्रावर एकाच वेळी मोठा हल्ला करू. आम्ही अद्याप त्यांच्या तेलाच्या साठ्यांना लक्ष्य केलेले नाही. आमच्यासाठी ते सर्वात सोपे लक्ष्य आहे.

इराणला पाषाणयुगात पाठवू

इराणची लष्करी ताकद बरीच कमकुवत झाली आहे. आमच्या मोहिमेचा मुख्य उद्देश लवकरच पूर्ण होणार आहे. इराणसोबत कोणताही समझोता झाला नाही, तर अमेरिका इराणला थेट पाषाणयुगात पाठवून देईल. तथापि, त्यांनी इराणमध्ये सत्तापालट झाला असून, नवीन नेतृत्व पूर्वीपेक्षा कमी कट्टर आहे, असा दावा केला.

ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला काय सांगितले?

इराणची क्षेपणास्त्र-ड्रोन क्षमता, नौदल नष्ट झाले

इराणचे प्रमुख नेते मारले गेले; सत्तांतर झाले आहे

इराणने आपल्याच

45 हजार लोकांना

ठार मारले

इराणला अणुशक्ती संपन्न बनू दिले

जाणार नाही

करार झाला नाही, तर इराणला नष्ट केले जाईल

सौदी अरेबिया-बहरीनला एकाकी सोडणार नाही

ट्रम्प यांना भीक घालत नाही; इराणचा इशारा

ट्रम्प यांच्या धमकीला भीक न घालता इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने म्हटले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी आमच्या नियंत्रणात आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेपर्वा विधानांमुळे ती खुली होणार नाही. जेव्हा इराणच्या अटी मान्य केल्या जातील, तेव्हाच हा मार्ग खुला केला जाईल, असे ‘आयआरजीसी’ने म्हटले आहे. आमच्यावर जमिनीवरील (ग्राऊंड अटॅक) हल्ले झाल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांचा कदापि टिकाव लागणार नाही. त्यांचा नि:पात करू, असा निर्वाणीचा इशारा इराणचे लष्करप्रमुख अमीर हातामी यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT