तेल अवीव; पीटीआय : इस्रायल-हमास शस्त्रसंधी आणि ओलिसांची सुटका हा आनंदाचा दिवस आहे. 20 धाडसी ओलिस त्यांच्या कुटुंबाच्या प्रेमळ मिठीत परतत आहेत आणि इतर 28 जण पवित्र भूमीवर चिरविश्रांती घेण्यासाठी परततील. आता बंदुका शांत झाल्या आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांतील शस्त्रसंधीवर भावना व्यक्त केल्या.
इस्रायली संसदेत ट्रम्प यांनी भाषण केले. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी ओलिसांची सुटका करण्यासाठी हमासवर दबाव आणण्याकरिता एकत्र आलेल्या अरब आणि मुस्लिम जगाचे कौतुक केले. आता अखेर इस्रायली, पॅलेस्टिनी आणि इतर अनेकांसाठी ते दीर्घ आणि वेदनादायक दुःस्वप्न संपले आहे. इराणचे अनेक मोठे दहशतवादी संपवण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले, आम्ही नुकतेच 28 नवीन बी-2 बॉम्बर विमानांची ऑर्डर दिली आहे.
इस्रायली आणि पॅलेस्टिनींसाठी ते दीर्घ आणि वेदनादायक दुःस्वप्न अखेर संपले आहे. जशी धूळ खाली बसेल, धूर विरून जाईल, ढिगारे हटवले जातील आणि राख हवेतून स्वच्छ होईल... तसे एक सुंदर आणि अधिक उज्ज्वल भविष्य अचानक तुमच्या आवाक्यात येईल, असे अमेरिकेच्या अध्यक्षांनी पुढे म्हटले.
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम घडवून आणल्यानंतर आणि सोमवारच्या ओलिस-कैद्यांच्या देवाणघेवाणीवर देखरेख केल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इस्रायली संसदेत (क्नेसेट) जोरदार स्वागत झाले. खासदारांनी 79 वर्षीय ट्रम्प यांचे अडीच मिनिटे उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.
ओलिसांच्या परतण्याबद्दल बोलताना, ट्रम्प म्हणाले की, त्यांनी आठ युद्धे संपवली आहेत. ओलिस परत आले आहेत, हे सांगताना त्यांना आनंद होत आहे आणि त्यांच्या मते, ते घरी परतल्यानेच युद्धाचा शेवट झाला आहे. ओलिस परत आले आहेत; हे सांगताना खूप बरे वाटत आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.