वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (दि. २२) आणखी एक ‘टॅरिफ बॉम्ब’ टाकला. ऑगस्ट २०२८ पासून परदेशातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर भरमसाट आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी करून जगभरातील औषध निर्माता कंपन्यांना हादरा दिला. भारत हा जेनेरिक औषधे अमेरिकेला निर्यात करणारा सर्वात मोठा देश असल्याने या निर्णयाचा थेट फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.
आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर या त्रिस्तरीय निर्णयाची माहिती देताना ट्रम्प यांनी अशा औषध उत्पादनांची निर्मिती देशांतर्गत (ऑनशोअरिंग) वाढवण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगितले. हा टप्प्याटप्प्याने लागू होणारा टॅरिफ प्लॅन येत्या १ ऑगस्टपासून अंमलात येईल. पहिल्या दोन वर्षांसाठी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर शून्य टक्के टॅरिफ लागू राहील. तिसऱ्या वर्षी हे आयात शुल्क १०० टक्क्यांपर्यंत वाढवले जाईल आणि त्यानंतर ते २०० टक्के केले जाईल.
ते म्हणाले, जेनेरिक औषधनिर्मितीची उत्पादने पुन्हा अमेरिकेत आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. ज्या कंपन्या त्यांना दिलेल्या मुदतीत अमेरिकेत प्रकल्प व उपकरणे उभारणार नाहीत, त्यांना हा दंड भरावा लागेल. अमेरिकेच्या नागरिकांचे रक्षण करणे हा या धोरणाचा मूळ उद्देश आहे. पेटंट असलेल्या, ब्रँडेड किंवा इनोव्हेटिव्ह औषधांवरील धोरण अत्यंत यशस्वी ठरले असून ते पूर्ववत लागू राहील.
जगभरातील विविध देशांना मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांचा पुरवठा करणार्या भारताला ‘जगाची फार्मसी’ म्हटले जाते. अमेरिकेत एकूण वापरापैकी सुमारे ४० टक्के जेनेरिक औषधांचा पुरवठा फक्त भारताकडून होतो. ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’च्या (जीटीआरआय) अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये भारताने अमेरिकेला ९.७ अब्ज डॉलर्सच्या औषधांची निर्यात केली. ती भारताच्या एकूण २५.८ अब्ज डॉलर्सच्या जागतिक औषध निर्यातीपैकी ३८ टक्के होती.
* ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफच्या धमकीचा भारतीय औषध कंपन्यांवर कसा व किती परिणाम होईल, हे अद्याप अस्पष्ट.
* भारत व अमेरिका यांच्यात फेब्रुवारीत झालेल्या व्यापार करारात भारताला ‘जेनेरिक औषधे व त्यातील घटकांबाबत वाटाघाटीचे अधिकार मिळतील’ अशी अट होती.
* यापूर्वी ट्रम्प यांच्या औषध पुरवठादारांवर टॅरिफ लादण्याच्या धमक्यांमुळे भारतातून होणाऱ्या स्वस्त औषध पुरवठ्यावर संकट निर्माण झाले होते.
* उच्च रक्तदाब, नैराश्य, मधुमेह, कर्करोग, संसर्गजन्य आजार य मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांवर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय जेनेरिक औषधांचा वापर.
* ‘फायनान्शियल पोस्ट’च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांच्या प्रीस्क्रिप्शनपैकी सुमारे ६५ टक्के औषधांचे उत्पादन ग्लॅनमार्क फार्मास्युटिकल्स व ल्युपिन लिमिटेड या दोन भारतीय कंपन्यांनी केले होते.