Donald Trump Crypto Earnings | क्रिप्टोमधून डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षात कमावले १२ हजार कोटी 
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Crypto Earnings | क्रिप्टोमधून डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षात कमावले १२ हजार कोटी

रिअल इस्टेटपेक्षा क्रिप्टो व्यवसाय ठरला कमाईचा सर्वात मोठा स्रोत

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२५ या वर्षात आपल्या कुटुंबाशी संबंधित क्रिप्टोकरन्सी व्यवसायांतून १.४ अब्ज डॉलरहून अधिक (सुमारे १२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) उत्पन्न मिळवल्याचा खुलासा त्यांच्या वार्षिक आर्थिक विवरणपत्रातून समोर आला आहे. अमेरिकेच्या युनायटेड स्टेटस ऑफिस ऑफ गव्हर्न्मेेंट एथिक्सने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या ९२७ पानी आर्थिक खुलाशात ही माहिती देण्यात आली आहे. या खुलाशानुसार, ट्रम्प यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत क्रिप्टो व्यवसाय ठरला असून, रिअल इस्टेट आणि न्यायालयीन समझोत्यांमधून मिळालेल्या उत्पन्नापेक्षाही त्यातून अधिक महसूल मिळाला आहे.

वर्ल्ड लिबर्टी फायनान्शिअलकडून ५५० दशलक्ष डॉलर

आर्थिक विवरणपत्रानुसार, वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या क्रिप्टो उपक्रमाच्या टोकन विक्रीतून ट्रम्प यांनी ५५० दशलक्ष डॉलरहून अधिक कमाई केली. सप्टेंबर २०२४ मध्ये ट्रम्प यांची मुले तसेच अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या मुलांनी हा उपक्रम सुरू केला होता. ट्रम्प यांची या संस्थेत 'सहसंस्थापक एमेरिटस' अशी नोंद आहे. याशिवाय, वर्ल्ड लिबर्टी फायनान्शिअलमधील भागीदारी विकून त्यांना २६० दशलक्ष डॉलर मिळाले.

मेमकॉईन व्यवसायातून ६३५ दशलक्ष डॉलर

ट्रम्प यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्रम्प (मेमकॉईन) व्यवसायाशी संबंधित सीसीआय डिजिटल या कंपनीमार्फत ६३५ दशलक्ष डॉलरहून अधिक उत्पन्न मिळवल्याचेही जाहीर केले आहे. 'सेलिब्रेशन कॉईन्स'सोबतच्या परवाना करारातून मिळालेल्या रॉयल्टीचा यात मोठा वाटा आहे. याशिवाय, सीआयसी डिजिटलच्या डिजिटल वॉलेटमध्ये किमान ६० दशलक्ष डॉलर मूल्याच्या विविध क्रिप्टोकरन्सी असल्याचेही विवरणपत्रात नमूद आहे. तसेच स्टेबलकॉईन होल्डकोमधील समभाग विक्रीतून ट्रम्प यांनी १९६ दशलक्ष डॉलरहून अधिक कमाई केली आहे.

रिअल इस्टेटमधूनही मोठे उत्पन्न

क्रिप्टो व्यवसायाबरोबरच ट्रम्प यांना गोल्फ कोर्स आणि रिसॉर्टस्‌म‌धून ५०० दशलक्ष डॉलरहून अधिक महसूल मिळाला. याशिवाय परदेशातील प्रकल्पांना 'ट्रम्प' हे नाव वापरण्याचा परवाना देऊन ५२ दशलक्ष डॉलर, तर विविध माध्यम संस्थांशी झालेल्या कायदेशीर समझोत्यांतून ८० दशलक्ष डॉलरहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

ट्रम्प यांची मालमत्ता ट्रस्टमध्ये

ट्रम्प यांची मालमत्ता त्यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या देखरेखीखालील ट्रस्टमध्ये ठेवण्यात आली असून, ट्रम्प उद्योग समूहाचे व्यवस्थापन त्यांच्या दोन मुलांकडे आहे. हा ट्रस्ट बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मात्र ट्रम्प यांच्याकडेच आहे.

'क्रिप्टो कॅपिटल' बनविण्याचे धोरण

दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी अमेरिकेला 'क्रिप्टो कॅपिटल ऑफ द वर्ल्ड' बनविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर क्रिप्टो क्षेत्राला अनुकूल धोरणे, नियामकांची नियुक्ती आणि उद्योगाला प्रोत्साहन देणारे कायदे करण्यात आले. ट्रम्प प्रशासनाने एआय आणि क्रिप्टोविषयक विशेष कार्यगट स्थापन केला. तसेच अमेरिकेचा स्ट्रॅटेजिक बिटकॉईन रिझर्व्ह निर्माण करण्याचा निर्णय घेतला. जिनियस ॲक्ट या कायद्याद्वारे स्टेबल कॉईन्ससाठी पहिली व्यापक संघीय नियामक चौकटही लागू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT