सेऊल; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी मला खूप आवडतात आणि ते एक कणखर व प्रशंसनीय नेते आहेत, असे गौरवोद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी येथे काढले. त्याचवेळी भारत- पाकिस्तान युद्धात नवी कोरी सात विमाने पाडण्यात आल्याच्या दाव्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.
‘एपीइसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसाठी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी या वर्षाच्या सुरुवातीच्या घटनांची आपली बाजू सांगितली. ट्रम्प पुढे म्हणाले, ‘जर तुम्ही भारत आणि पाकिस्तानकडे पाहिले, तर मी भारतासोबत एक व्यापार करार करत होतो आणि पंतप्रधान मोदींबद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे. ते खरोखरच एकमेकांवर चालून आले होते.’
त्यांनी पुढे सांगितले की, ते लढत असताना अमेरिका दोन्ही देशांसोबत कोणताही व्यापार करणार नाही, असे त्यांनी पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला सांगितले. ट्रम्प म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदींना सांगितले, आम्ही तुमच्यासोबत सध्या करार करू शकत नाही. कारण, तुम्ही पाकिस्तानसोबत लढत आहात. मग मी पाकिस्तानी पंतप्रधानांना फोन केला आणि सांगितले की, आम्ही तुमच्यासोबत करार करू शकत नाही. कारण, तुम्ही भारताशी लढत आहात.’
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ‘250% शुल्क (टॅरिफ)’ लावण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांनी 48 तासांच्या आत शत्रूत्व संपवण्यास सहमती दर्शविली. मे महिन्यात वॉशिंग्टनच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानने ‘संपूर्ण आणि तातडीच्या’ युद्धविरामावर सहमती दर्शवल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केल्यापासून, अमेरिकेच्या या 47 व्या राष्ट्राध्यक्षांनी हा दावा अनेकवेळा केला आहे. तथापि, भारताने अमेरिकेच्या कोणत्याही भूमिकेचा सातत्याने इन्कार केला आहे. शत्रूत्व संपवण्याचा निर्णय पाकिस्तानी डीजीएमओने त्यांच्या समकक्षाला केलेल्या विनंतीनुसार घेण्यात आला, असे भारताचे म्हणणे आहे.
ट्रम्प म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी... ते दिसायला खूप चांगले आहेत; पण ते एक ‘किलर’ (अतिशय कठोर आणि निर्णायक) आहेत. खूप कडक आहेत. युद्ध थांबविण्यासाठी विनंती केली असता ते म्हणाले, नाही, आम्ही लढू. मी म्हणालो, अरे देवा, हा तोच माणूस आहे, ज्याला मी ओळखतो?‘
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष मीच व्यापाराचा उपयोग करून थांबवला. जपान आणि दक्षिण कोरियातील कार्यक्रमांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हा दावा केला. 56 व्या वेळेस तो अधिक तपशीलवार सांगितला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ क्लिप शेअर करत म्हटले की, ‘स्व-घोषित, पण आता पूर्णपणे लहान आणि उघड झालेली 56 इंची छाती अजूनही शांत आहे.’