Donald Trump Currency Note | अमेरिकेत 250 डॉलरच्या नोटेवर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो?  
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Currency Note | अमेरिकेत 250 डॉलरच्या नोटेवर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो?

150 वर्षे जुना नियम बदलण्याच्या तयारीला सुरूवात

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन डीसी; वृत्तसंस्था : अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो असलेली 250 डॉलरची विशेष नोट जारी करण्याची तयारी सुरू झाली आहे. ट्रम्प प्रशासनानुसार, जर अमेरिकन काँग्रेसने संबंधित कायद्यात बदल केला, तर ही नवीन नोट छापण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी व्हाईट हाऊस ब्रीफिंगमध्ये या प्रकरणाची माहिती दिली.

सध्या अमेरिकेत असलेल्या नियमांनुसार कोणत्याही जिवंत व्यक्तीचा फोटो नोटेवर छापला जाऊ शकत नाही. हाच 150 वर्षे जुना नियम बदलण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, ट्रम्प हे अमेरिकन चलनावर स्थान मिळवणारे दीडशेहून अधिक वर्षांतील पहिले जिवंत व्यक्ती ठरतील.

अमेरिकेच्या स्थापनेला 250 वर्षे पूर्णस्मारक नोट

वर्ष 2026 मध्ये अमेरिकेच्या स्थापनेला 250 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक निमित्ताने तत्कालीन अध्यक्षांचा फोटो असलेली स्मारक नोट जारी करणे योग्य ठरेल, असे ट्रेझरी सेक्रेटरी बेसेंट यांनी सांगितले. ब्युरो ऑफ एन्ग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग या अमेरिकन चलन छापणार्‍या एजन्सीला नव्या नोटेचे डिझाईन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये ट्रम्प यांचा फोटो नोटेच्या मध्यभागी ठेवण्यात आला आहे. ब्रिटिश कलाकार इयान अलेक्झांडर यांच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांनी स्वतः या डिझाईनमध्ये अमेरिकन ध्वजाचे रंग आणि 250 व्या वर्धापनदिनाचा विशेष लोगो समाविष्ट करण्याचे सूचवले आहे.

जिवंत व्यक्तीचा फोटो छापण्यावर बंदी का?

अमेरिकेत 1866 पासून जिवंत व्यक्तीचा फोटो नोटेवर छापण्यावर कायदेशीर बंदी आहे.कारण सत्तेचा गैरवापर आणि व्यक्तीपूजा रोखण्याच्या उद्देशाने हा नियम बनवण्यात आला होता. अमेरिकन नोटांवर सहसा केवळ दिवंगत पूर्व अध्यक्ष आणि ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांचेच फोटो छापले जातात.या प्रस्तावावरून आता अमेरिकेत राजकीय आणि कायदेशीर वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प समर्थक याला ऐतिहासिक गौरव मानत आहेत, तर विरोधक याला जुनी परंपरा मोडणारे पाऊल मानत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT