Donald Trump on Kashmir India-Pakistan ceasefire
दिल्ली : काश्मीरसंबंधी तोडगा काढण्यासाठी भारत आणि पाकिस्तानसोबत चर्चा करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार घडवून आणल्याची घोषणा शनिवारी ट्रम्प यांनी केली होती. यानंतर आता युद्धाआडून काश्मीर मुद्द्यात त्यांनी उडी घेतली आहे.
ट्रुथ सोशल या सोशल प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "हजार वर्षांनंतर का होईना, काश्मीरबाबत तोडगा निघतो का ते पाहण्यासाठी मी दोन्ही देशांसोबत चर्चा करण्यास तयार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांना देव चांगल्या कामासाठी आशीर्वाद देवो," असे ते म्हणाले. सध्याच्या आक्रमकतेवर पूर्णविराम देण्याचा निर्णय हा अत्यंत शहाणपणाचा आहे. अन्यथा प्रचंड जीवितहानी आणि विध्वंस घडला असता. कोट्यवधी निरपराध लोकांचा मृत्यू झाला असता. दोन्ही शेजारी देशांचा व्यापार वाढवण्यासाठी आणि काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांसोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. शांती करारामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये समृद्धी येईल, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानकडून तणाव वाढल्याची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकन प्रशासनाने तात्काळ भारताशी संपर्क साधला. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला आणि पाकिस्तानातील तणावाबाबत गुप्त माहिती दिली. व्हान्स यांनी ट्रम्प यांनाही परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतरच अमेरिका युद्धबंदीसाठी सक्रिय झाली आणि शनिवारी ट्रम्प यांनी घोषणा केली की भारत आणि पाकिस्तान तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदी करण्यास सहमत झाले आहेत.
युद्धविरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर करून टाकली. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्धच्या लष्करी कारवाया थांबवण्यास सहमती दर्शवली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी सोशल मीडिया पोस्टमध्ये जाहीर केले. मात्र, या शस्त्रसंधीचे श्रेय अमेरिकेला देण्यास भारताने स्पष्ट नकार दिला. पाकिस्तानशी थेट संवाद साधल्यानंतर युद्धबंदीचा करार झाल्याचे भारताने म्हटले आहे.