नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२७ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. भारत आणि अमेरिकादरम्यान बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या द्विपक्षीय व्यापारी कराराला अंतिम रूप देणे तसेच ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे, असे अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले.
काही काळापूर्वी अमेरिकेने भारतीय आयातीवर ५० टक्क्यांहून अधिक शुल्क लादल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
गोर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी ते स्वतः सध्या भारतात आले आहेत. फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तासभराहून अधिक वेळ सकारात्मक चर्चा झाली होती. या दोन्ही नेत्यांमधील वैयक्तिक सलोख्याचे संबंध या भागीदारीला अधिक बळकट करत आहेत. भारत आणि अमेरिकेतील व्यापारी कराराची बोलणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाली आहे.
याशिवाय, जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिका, भारत आणि व्हेनेझुएला यांच्यात त्रिपक्षीय सहकार्य होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची भारताची क्षमता पाहता, अमेरिका भारताला तेलपुरवठा वाढवण्यासाठी मदत करणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता तणाव लक्षात घेता, पुरवठा साखळीचे विविधीकरण करण्यासाठी भारताची तेल शुद्धीकरण क्षमता अमेरिकेसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२७ च्या सुरुवातीला भारताला भेट देणार असून दोन्ही देशांनी या ऐतिहासिक दौऱ्याची पूर्वतयारी सुरू केली आहे.
व्यापारी करार
प्रलंबित द्विपक्षीय व्यापारी करार अंतिम टप्प्यात असून पुढील काही आठवड्यांत किंवा महिन्यांत यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
ऊर्जा क्षेत्रात सहकार्य
ऊर्जा सुरक्षेसाठी अमेरिका, भारत आणि व्हेनेझुएला यांच्यात भागीदारी होऊ शकते, ज्यामध्ये भारताची तेल शुद्धीकरण क्षमता महत्त्वाची भूमिका बजावेल.
नेत्यांमधील सलोखा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील जी-७ परिषदेतील यशस्वी चर्चेनंतर या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.