Trump in jail? 
आंतरराष्ट्रीय

Trump in jail? इराणमधील रस्त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना घातले 'तुरुंगात'; तेहरानमधील घटनेने वेधले जगाचे लक्ष!

अमेरिकेने लादलेल्या इराण युद्वाचा वादग्रस्त कलाप्रदर्शनाने केला निषेध

Namdev Gharal

Donald Trump News | अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस टोकाला पोहोचत असतानाच, इराणच्या राजधानीत एका अनोख्या कलाप्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कला प्रदर्शनामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तेहरानमधील प्रसिद्ध तजरीश स्क्वेअर येथील एका मोठ्या बिलबोर्डवर थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या एका कलाकाराला तुरुंगाच्या कोठडीत डांबून ठेवल्याचे जिवंत दृश्य साकारण्यात आले आहे.

हे दृश्य न पाहणे हा एक गुन्हा आहे

याबाबत अधिक माहिती अशी की या चौकातील एका भव्य फलकावर एक तुरुंगाचा कप्पा (सेल) तयार करण्यात आला आहे. त्या आत डोनाल्ड ट्रम्प यांचा मुखवटा, गडद रंगाचा सूट आणि त्यांचा प्रसिद्ध लाल टाय परिधान केलेला एक कलाकार प्रत्यक्षात वावरताना दिसत आहे. तो खिशात हात घालून कोठडीत येरझाऱ्या घालत, विचार करत कधीतरी लोखंडी खाटेवर बसताना लोकांच्या नजरेस पडतो. या बिलबोर्डवर पर्शियन भाषेत "हे दृश्य न पाहणे हा एक गुन्हा आहे" अशी ठळक ओळ लिहिण्यात आली आहे. अमेरिका-इराणमधील तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण सरकारने राबवलेल्या व्यापक प्रचार मोहिमेचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेच्या दोन मोठ्या हल्ल्यांचा उल्लेख

तुर्की वृत्तसंस्था 'हाबरलर' (Haberler) च्या हवाल्यानुसार, या प्रतीकात्मक तुरुंगाच्या फलकावर अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या दोन भीषण हल्ल्यांचा उल्लेख करून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी होर्मोझगान प्रांतातील मिनाब येथील 'शजरेह तय्यिबा' या प्राथमिक शाळेवर अमेरिकन टॉमहॉक क्षेपणास्त्र डागले होते. या भीषण हल्ल्यात सुमारे १२० हून अधिक निष्पाप शाळकरी मुलांसह शिक्षक आणि पालकांचा मृत्यू झाला होता; मृतांचा आकडा १५६ ते १७५ दरम्यान असल्याचे इराणी प्रशासनाने सांगितले होते.

अमेरिकेच्या प्राथमिक लष्करी तपासानुसार, कालबाह्य गुप्तचर माहिती आणि एआय (AI) टार्गेटिंग डेटावरील अवलंबित्वामुळे ही चूक झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी "युद्धात चुका होतात, युद्ध अत्यंत भीषण असते. हे कोणी मुद्दाम केलेले नाही," अशी प्रतिक्रिया दिली होती.

सिरिकमधील विवाह सोहळ्यावरील हल्ला

दुसरी घटना १ सप्टेंबर रोजी सिरिक काउंटीमधील कुहेस्तक येथे घडली. होर्मोझ सामुद्रधुनीजवळ आयआरजीसीच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यादरम्यान एक क्षेपणास्त्र थेट एका निवासी घरावर पडले, जेथे एका कुटुंबाचा लग्नसमारंभ सुरू होता. 'अल जझीरा'च्या वृत्तानुसार, यामध्ये चार वर्षांच्या चिमुरड्या आमिर अली करिमीसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ६० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. इराणने या दोन्ही घटनांना उघडपणे 'युद्धगुन्हे' म्हटले आहे, तर अमेरिकन लष्कराने आम्ही निष्पाप नागरिकांना कधीही लक्ष्य करत नाही असा दावा कायम ठेवला आहे.

या दोन मोठ्या हल्ल्याचा निषेध म्हणून हे कलाप्रदर्शन केले आहे. याविषयी काही इराणी नागरिकांना विचारले असता ते म्हणाले की सुरवातील इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यासमुळे येथील प्रश्न सुटतील असे वाटले होते पण आता ते अधिकच जटील झाले आहेत असे स्पष्ट केले.

तेहरानमधील या थेट कलाप्रदर्शनाचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, कला आणि निषेधाच्या माध्यमातून अमेरिकेवर राजकीय दबाव वाढवण्याचा इराणचा हा प्रयत्न सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT