वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसची (संसद) परवानगी घेतली नाही, तर इराण युद्ध संपुष्टात आणण्याची तरतूद असणाऱ्या युद्ध अधिकार प्रस्तावाला अमेरिकन सिनेटने मंगळवारी मंजुरी दिली. अमेरिका आणि इस्रायली दलांनी इराणवर हल्ले सुरू केल्याच्या 80 दिवसांनंतर ट्रम्प यांना हा मोठा झटका मनला जात आहे.
या प्रस्तावावर मतदानाच्या बाजूने 50 आणि विरोधात 47 मते पडली. ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या चार सदस्यांनी पक्षाची भूमिका डावलून, डेमोक्रॅटस्च्या बाजूने मतदान केले. तर, तीन रिपब्लिकन सदस्य मतदानाला गैरहजर होते.
संविधानात नमूद केल्यानुसार, सैन्याला युद्धात पाठवण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नसून काँग्रेसला (संसदेला) असावा, असे मानणाऱ्या लोकप्रतिनिधींचा हा विजय मानला जात आहे, ज्यांचा असा युक्तिवाद आहे की, हे केवळ एक प्रक्रियात्मक मतदान होते आणि हा प्रस्ताव प्रत्यक्षात येण्यापूर्वी अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
या प्रस्तावाचे प्रायोजक असलेले व्हर्जिनियाचे डेमोक्रॅटिक सिनेटर टीम केन म्हणाले की, युद्धविरामामुळे ट्रम्प यांना काँग्रेससमोर आपली बाजू मांडण्याची उत्तम संधी मिळाली आहे; कारण 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेले अमेरिका-इस्रायल युद्ध संपवण्यासाठी तेहरानने (इराण) एक नवीन प्रस्ताव दिल्याचे स्वतः राष्ट्राध्यक्षांनी सांगितले आहे.
चर्चेदरम्यान केन म्हणाले, आम्ही पुन्हा युद्ध सुरू करण्यापूर्वी चर्चा करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. राष्ट्राध्यक्षांना शांतता आणि राजनैतिक प्रस्ताव मिळत आहेत; परंतु ते आमच्याशी शेअर न करता थेट कचऱ्याच्या पेटीत टाकत आहेत.
100 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला, तरीही त्याला रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये (कनिष्ठ सभागृह) मंजूर व्हावे लागेल. तसेच, ट्रम्प यांच्याकडून संभाव्य ‘व्हेटो’ (नकाराधिकार) वापरला गेल्यास, तो मोडीत काढण्यासाठी हाऊस आणि सिनेट दोन्ही सभागृहांमध्ये दोनतृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल.
पेनेसिल्व्हेनियाचे सिनेटर जॉन फेटरमन हे या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणारे एकमेव डेमोक्रॅट सदस्य होते. तर दुसरीकडे, केंटकीचे रँड पॉल, मेनच्या सुसान कॉलिन्स आणि अलास्काच्या लिसा मुरकोव्स्की या रिपब्लिकन सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराकडून प्राथमिक निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काही दिवसांतच लुईझियानाचे सिनेटर बिल कॅसिडी यांनीही प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.
1) सिनेटचा ट्रम्प यांना झटका : अमेरिकन सिनेटने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीविना सुरू असलेल्या इराण युद्धाला चाप लावण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला.
2) पक्षांतर्गत बंडखोरी : ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या चार खासदारांनी बंडखोरी करत मतदान केल्यामुळे हा प्रस्ताव 50 विरुद्ध 47 मतांनी मंजूर झाला.
3) कायद्याचे उल्लंघन : 1973 वॉर पॉवर्स लॉनुसार संसदेच्या मंजुरीशिवाय 60 दिवसांपेक्षा जास्त काळ युद्ध चालू ठेवता येत नसतानाही, 80 दिवसांनंतर इराणवर हल्ले सुरूच आहेत.
ट्रम्प यांनी 1 मे रोजी घोषित केले होते की, युद्धविरामामुळे इराणविरुद्धचे शत्रुत्व संपुष्टात आले आहे. या दाव्यानंतरही अमेरिका इराणच्या बंदरांना वेढा घालत आहे आणि इराणी जहाजांवर हल्ले करत आहे; तर दुसरीकडे इराण होर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे रोखून अमेरिकन जहाजांवर हल्ले करत आहे.