अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डीसी ः त्यांनी माझी हत्या करण्याआधी मी त्यांना संपविले, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रात्री एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगून इराणवरील हल्ल्यामागील एक वैयक्तिक पैलूही निदर्शनास आणला.
2024 मध्ये इराणने आपली हत्या करण्याचे प्रयत्न केले, हा मुद्दा अमेरिका -इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईला आदेश देताना निर्णायक ठरल्याचे त्यांनी मान्य केले. याआधी इराणकडून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा मध्यपूर्वेत युद्ध छेडण्याच्या त्यांच्या विचारांवर कसा परिणाम झाला, याबाबत ट्रम्प यांनी कधीही थेट भाष्य केले नव्हते. जुलै आणि सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या हत्या प्रयत्नांसह या धमक्यांनी 2024 च्या निवडणूक प्रचारकाळात ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांच्या वर्तुळात हा चर्चेचा विषय होता. सतत सुरक्षा सतर्कता, विमाने बदलणे, ताफ्याचे मार्ग बदलणे अशा तातडीच्या उपाययोजना त्यावेळी कराव्या लागत होत्या. ट्रम्प यांना ठार मारण्याच्या इराणच्या इराद्याचा संदर्भ जानेवारी 2020 मध्ये झालेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यापर्यंत जातो. यात जनरल कासिम सुलेमानी ठार झाले होते. यासंदर्भात फेडरल अभियोजकांनी इराणशी ंनिगडित कथित ‘भाडोत्री खुनां’च्या दोन कटांशी संबंधित खटले दाखल केले आहेत; मात्र 2024 मध्ये ट्रम्प यांच्यावर झालेल्या दोन हत्या प्रयत्नांशी इराणचा थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. तरीही ट्रम्प यांनी एबीसीला सांगताना संबंध असल्याचे सूचित केले. त्यांनी दोनदा प्रयत्न केले, असे ते म्हणाले.