वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत अमेरिकन नागरिकांसाठी आश्चर्यकारक घोषण केली. अमेरिकेने लादलेल्या ‘टॅरिफ’मुळे सरकारला अब्जावधीचे उत्पन्न मिळाले आहे आणि या उत्पन्नातून प्रत्येक अमेरिकन नागरिकाला 2,000 डॉलर (सुमारे 1.70 लाख रुपये) ‘डिव्हिडंड’ दिला जाईल. मात्र, या घोषणेत श्रीमंत नागरिकांना वगळले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प म्हणाले की, ‘टॅरिफच्या विरोधात बोलणारे लोक मूर्ख आहेत. आमच्या सरकारने अमेरिकेला जगातील सर्वात श्रीमंत आणि आदरणीय देश बनवले आहे, जिथे महागाई नगण्य आहे आणि शेअर बाजार उच्च पातळीवर आहे.’
अमेरिकेचे ट्रेझरीचे सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी एका मुलाखतीत ट्रम्प यांच्या या घोषणांवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्याशी त्यांची या डिव्हिडंड विषयावर चर्चा झालेली नाही. मात्र, कदाचित हा लाभ कर कपात स्वरूपात मिळू शकतो. बेसेन्ट यांचे मुख्य लक्ष कर्जफेडीवर असून, थेट नागरिकांना पैसे देण्यात नाही. ऑगस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेच्या 38.12 ट्रिलियन कर्जाची भरपाई टॅरिफ उत्पन्नातून केली जाईल.
अमेरिकेतील वृत्तपत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या या योजनेमुळे उलट आर्थिक तणाव वाढू शकतो. कारण, ट्रेझरीच्या सप्टेंबर महिन्याच्या अहवालानुसार, 2025 आर्थिक वर्षात ‘टॅरिफ’मुळे 195 बिलियन उत्पन्न झाले आहे. जर 2,000 डॉलर प्रत्येक नागरिकाला दिले, तर खर्च 500 बिलियन इतका होईल. जो सध्याच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे. यामुळे असे दिसते की, जर ट्रम्प योजनेची अंमलबजावणी झाली, तर अमेरिकेच्या कर्जावर अतिरिक्त भार पडेल, त्यामुळे कर्ज कमी होण्याऐवजी उलट वाढू शकते.
या घोषणेत ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही की, हा लाभ कोणत्या निकषांवर दिला जाईल, कोणत्या उत्पन्न मर्यादेपर्यंत लोकांना हा लाभ मिळणार आहे किंवा हा डिव्हिडंड कधी देण्यात येईल. दरम्यान, यापूर्वीही ट्रम्प यांनी ऑक्टोबरमध्ये बोलताना 1,000 ते 2,000 डॉलरपर्यंतचा रिबेट दिला जाऊ शकतो, असे सूचित केले होते.