वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ड्रग्ज तस्करी आणि त्याच्या व्यापाराशी संबंधित चिंताजनक देशांच्या यादीत भारताचा समावेश केला आहे. या वादग्रस्त यादीत एकूण 23 देशांची नावे असून, त्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या संसदेला ‘प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन रिपोर्ट’ नावाचा एक महत्त्वपूर्ण अहवाल सादर करताना हा निर्णय घेण्यात आला. या अहवालाद्वारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दरवर्षी अशा देशांची ओळख पटवतात, जिथे ड्रग्जची शेती, निर्मिती किंवा तस्करीचा धोका अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतो.
या अहवालाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रग्ज विरोधात पुरेशी पावले उचलत नसलेल्या देशांना ओळखणे हा आहे. अमेरिका या देशांना सहकार्य करते, मात्र जर या देशांनी या प्रकरणात ठोस कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर आर्थिक मदत किंवा व्यापारी सवलतींमध्ये कपात करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
अहवालात भारतावर ड्रग्ज तस्करीला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केलेला नाही; मात्र ड्रग्जच्या वाहतुकीसाठी आणि निर्मितीसाठी भारत एक ‘स्रोत’ आणि ‘मार्ग’ देश म्हणून समोर आला आहे, असे नमूद केले आहे. विशेषतः पंजाब, मणिपूर आणि काही किनारी भागांमध्ये ड्रग्ज तस्करीच्या कारवाया वाढल्याचे दिसून आले आहे. या भागांतील नशेच्या व्यापाराची पाळेमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमांपर्यंत पोहोचली असून, हा एक आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे.