diwali celebrations at white house indians gift a hanuman chalisa to trump
पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये यंदा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह भारतीय वंशाचे अनेक नामवंत उद्योजक, सेलिब्रिटी आणि भारतीय समुदायातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली. यावेळी पारंपरिक पद्धतीने दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. या सोहळ्यात भारतीय टेक उद्योजक आणि GOQii चे संस्थापक विशाल गोंडल विशेष आकर्षण ठरले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांना हनुमान चालीसेची एक प्रत भेट दिली.
गोंडल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर या खास क्षणाचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत त्यांनी लिहिले, "ओव्हल ऑफिसमध्ये प्रकाशाचे सुंदर क्षण! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे आणि त्यांना हनुमान चालीसेची एक प्रत भेट देणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेले हे पवित्र स्तोत्र आपल्यापैकी कोट्यवधी लोक दररोज साहस, भक्ती आणि शक्तीसाठी पठण करतात."
पुढे त्यांनी सांगितले की, दिवे प्रज्वलित करताना भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक दृढ व्हावी तसेच अंधारावर प्रकाशाचा विजय व्हावा, अशी प्रार्थना केली.
‘जुग जुग जिओ’चा दिला आशीर्वाद
पारंपरिक भारतीय आशीर्वादाचा उल्लेख करताना गोंडल यांनी 'जुग जुग जिओ' या शब्दांचा अर्थही स्पष्ट केला. याचा अर्थ दीर्घायुषी व्हा, असा होतो. यावेळी मी जगभरातील लोकांसाठी शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची कामना केली, असे त्यांनी नमूद केले.
या दिवाळी सोहळ्याला भारतीय समुदायातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही उपस्थिती लावली. यामध्ये जगप्रसिद्ध मिशेलिन स्टार शेफ विकास खन्ना आणि कॅनडाच्या माजी खासदार रुबी ढाला यांचा समावेश होता.
व्हाइट हाऊसमध्ये मोठा प्रशासकीय बदल
दिवाळीच्या उत्साहात व्हाइट हाऊसमध्ये एका महत्त्वाच्या प्रशासकीय फेरबदलाची घोषणाही करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे निकटवर्तीय सहकारी आणि सध्याचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांची व्हाइट हाऊसच्या नव्या 'चीफ ऑफ स्टाफ'पदी नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. सोमवारपासून ते या पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. ते सूझी वाइल्स यांची जागा घेतील. सूझी वाइल्स आता प्रशासनाच्या राजकीय मोहिमा आणि धोरणात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळणार आहेत.