पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जगभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही दिवाळी साजरी केली जात आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेदेखील या सेलिब्रेशनसाठी उपस्थित होते.
या दिवाळी कार्यक्रमात भारतीय अमेरिकन राजकीय नेते आणि कर्मचाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) च्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच 'व्हाइट हाऊसच्या मिलिटरी बँडला दिवाळीसाठी ओम जय जगदीश हरे वाजवताना ऐकणे खूप छान वाटल्याचे म्हणत भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली, अमेरिकन लोकांना शुभेच्छा दिल्या आणि दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाच्या योगदानाचा गौरव केला. दिवाळीनिमित्त आयोजित महोत्सवात उपस्थितांना संबोधित करताना म्हटले आहे की, "अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या नात्याने व्हाईट हाऊसमध्ये सर्वात मोठ्या दिवाळी रिसेप्शनचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. माझ्यासाठी हा सण खूप महत्त्वपूर्ण आहे.'' अशी भावना बायडेन यांनी व्यक्त केली आहे.
बायडेन म्हणाले, 'दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाने अमेरिकन जीवनाचा प्रत्येक भाग समृद्ध केला आहे. आता, दिवाळी व्हाईट हाऊसमध्ये खुलेपणाने आणि अभिमानाने साजरी केली जाते. ते पुढे म्हणाले, 'हे माझे घर नाही; हे तुमचे घर आहे. आपल्यासारख्या वैविध्यपूर्ण देशात आपण वादविवाद करतो आणि असहमत असतो पण आपण इथे कसे आणि का पोहोचलो हे आपण कधीच विसरतो.
अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याला मोठा इतिहास आहे. राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 2003 मध्ये ही परंपरा सुरू केली, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही दिवाळी साजरी केली. त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये दिवा लावला. बायडेन यांनी 2016 मध्ये उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी दिवाळी रिसेप्शनचे आयोजन केले होते आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील 2017 मध्ये ही परंपरा सुरू ठेवली होती.