US-China tensions Deport Xi Mingze daughter of Xi Jinping Trump ally Laura Loomer Chinese students in USA Harvard CCP influence in academia
वॉशिंग्टन: अमेरिकेत चिनी नागरिकांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईच्या दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक आणि दक्षिणपंथी राजकीय टीकाकार लॉरा लूमर यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या एकुलत्या मुलीला अमेरिकेतून हाकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेच्या बदललेल्या स्थलांतर धोरणाचा फटका अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बसणार आहेत. त्यात जवळपास 3 लाख चिनी विद्यार्थी आहेत. तर अनेक भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
लूमर यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, "चला, क्षी जिनपिंग यांच्या मुलीला निर्वासित करा!" क्षी मिंगझे मॅसाच्युसेट्समध्ये राहते आणि हार्वर्डमध्ये शिकली आहे!
CCP (चायनीज कम्युनिस्ट पार्टी) चे PLA (पीपल्स लिबरेशन आर्मी) जवान तिच्या सुरक्षेसाठी अमेरिकेतील मॅसाच्युसेट्समध्ये तैनात आहेत!" असा आरोपही त्यांनी केला आहे.
परंतु, लूमर यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत किंवा त्यांच्याकडील माहितीचे "स्रोत" कोण आहेत हे त्यांनी सांगितलेले नाही. तथापि, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना टॅग केले.
दरम्यान, सध्या क्षी मिंगझे अमेरिकेत राहत आहे याचा कोणताही सार्वजनिक पुरावा उपलब्ध नाही.
2015 मध्ये ‘द न्यू यॉर्कर’ या प्रसिद्ध अमेरिकी नियतकालिकाने दिलेल्या अहवालानुसार, हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिंगझे चीनमध्ये परतली आणि "जशी गुपचूप आली, तशीच गुपचूप परतली," असे त्या अहवालात नमूद केले आहे.
क्षी मिंगझे ही चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि गायिका पेंग लीयुआन यांची एकुलती मुलगी आहे. तिच्याविषयी अतिशय कमी माहिती सार्वजनिक झाली आहे.
तिचा जन्म 1992 मध्ये झाल्याचे सांगितले जाते. 2008 मध्ये ती सिचुआन भूकंपावेळी बचावकार्यामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झाली होती.
‘द न्यू यॉर्कर’च्या 2015 च्या रिपोर्टनुसार, तिने हार्वर्ड विद्यापीठामध्ये मानसशास्त्र आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले आणि आपली मूळ ओळख जाहीर न करता खोट्या नावाने वास्तव्य केले होते. तिची खरी ओळख केवळ 10 हून कमी लोकांना माहिती होती. त्यात मोजके प्राध्यापक व मित्रपरिवाराचा समावेश होता.
या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी चिनी विद्यार्थ्यांविरोधात नवीन व्हिसा निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, "चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असलेल्या किंवा संवेदनशील क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले जातील."
या धोरणाचा परिणाम हजारो चिनी विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, जे अमेरिकन विद्यापीठांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक स्रोत तसेच टेक क्षेत्रासाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ आहेत.
ही मागणी अशा वेळी आली आहे जेव्हा चीनच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत विरोध केला जात आहे. चीनचा अमेरिकेतील शिक्षण व धोरणांवरील प्रभाव यावरून तणाव वाढलेला आहे.
विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाशी कायदेशीर संघर्ष सुरू केला आहे.
ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डवर "ज्यूविरोधी प्रचार" आणि CCP सोबत संगनमताचे आरोप केले आहेत. यानंतर ट्रम्प यांनी विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार रद्द केले होते, परंतु एका फेडरल न्यायाधीशाने त्यावर तात्पुरता स्थगिती आदेश दिला.