नवी दिल्ली : तुर्कियेमधील इस्तंबूल येथे ताब्यात घेण्यात आलेला सलीम डोला हा मेफेड्रोन उत्पादन करणारा आणि फरार डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. डोंगरीचा रहिवासी असलेला डोला हा जवळपास 10 वर्षांपूर्वी भारतातून पळून गेला आणि तेव्हापासून तो परदेशातून आपले काळे धंदे चालवत होता. डोला हा देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या अमली पदार्थांचे नेटवर्क चालवत होता.
भारतीय यंत्रणा अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने त्याला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने यापूर्वी त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
मुंबई गुन्हे शाखेने 2024 मध्ये चार किलो एमडी जप्त केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासात डोला याचा सहभाग उघड झाला होता. या तपासात सांगली आणि सुरतपासून ते यूएई आणि तुर्कियेपर्यंत पसरलेली पुरवठा साखळी उघड झाली होती.
डोला परदेशात बसून आपल्या हस्तकांमार्फत हे ऑपरेशन चालवत होता. गेल्या वर्षी इंटरपोलच्या माध्यमातून त्याचा मुलगा ताहेर आणि पुतण्या मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांना यूएईतून हद्दपार करण्यात आले होते. यामुळे डोला याचे नेटवर्क कमकुवत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नार्कोटिक्स एजन्सीच्या रडारावर असलेल्या डोलाचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल्सशी जोडले गेले आहेत. त्याला सर्वात आधी 1998 मध्ये मुंबई विमानतळावर 40 किलो मँड्रॅक्ससह अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणांच्या मते सलीम मिर्चीनंतर डी कंपनीच्या अमली पदार्थांशी संबंधित व्यवहार डोला सांभाळत होता. याबरोबरच एक हजार कोटी रुपयांचा फेंटॅनिल साठा आणि डीआरआय गुटखा तस्करी प्रकरणासारख्या मोठ्या कारवायांमध्येही त्याचे नाव समोर आले होते. तपास यंत्रणांच्या मते, त्याची टोळी एमडी तयार करण्यासाठी पैसे पुरवणे, प्रीकर्सर पुरवठा करणे अशी कामे करते.