पुढारी ऑनलाईन : "पाकिस्तानमध्ये आम्हाला भेदभावाचा सामना करावा लागला. आज आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवत आहोत. पाकिस्तानमधील धार्मिक भेदभावामुळे माझी कारकीर्द उद्ध्वस्त झाली,"अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया ( Danish Kaneria) यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. तो वॉशिंग्टन डीसी येथे 'पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची दुर्दशा' या विषयावर तो बोलत होता.
ANIशी बाेलताना दानिश कनेरिया म्हणाला की, " पाकिस्तानात आमच्याशी कसे वागले याचा अनुभव शेअर करण्यासाठी आम्ही सर्वजण येथे जमलो हाेताे. आम्ही या सर्व गोष्टींविरुद्ध आवाज उठवला. अशा गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत. माझी कारकीर्द उद्ध्वस्त झाली. मला पाकिस्तानमध्ये समान आदर मिळाला नाही. म्हणूनच आम्ही येथे अमेरिकेत आहोत. आम्हाला फक्त जागरूकता पसरवायची होती."
२०२३ मध्ये 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कनेरियाने खुलासा केला होता की शाहिद आफ्रिदीने त्याला अनेक वेळा धर्मांतर करण्यास सांगितले होते. कनेरिया म्हणाला हाेता की," शाहिद आफ्रिदीने मला अनेक वेळा इस्लाम स्वीकारण्यास सांगितले, तर माजी कर्णधार इंझमाम-उल-हक हा एकमेव कर्णधार होता ज्याने त्याला पाठिंबा दिला."
पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दानिश कनेरियाने ६१ कसोटी सामन्यांमध्ये ३.०७ च्या इकॉनॉमी रेटने २६१ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एका डावात १५ वेळा पाच विकेट्स घेतल्याचा समावेश आहे. ईसीबी (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) ने २०१२ मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी ठरवल्यानंतर दानिश कनेरियावर आजीवन बंदी घातली हाेती.