दम्माम; वृत्तसंस्था : पूर्व सौदी अरेबियातील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका भारतीयासह दोघांना जीव गमवावा लागला. रियाधमधील भारतीय दूतावासाने या घटनेची अधिकृत पुष्टी केली असून मृतांच्या व जखमींच्या कुटुंबीयांशी तत्काळ संपर्क साधण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
सौदी नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण हल्ल्यात एका सौदी नागरिकाचाही मृत्यू झाला असून अन्य आठजण जखमी झाले. हल्ल्यामुळे विमानतळाच्या इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून सुरक्षा कारणास्तव ‘फ्लाईटरडार २४’ च्या नोंदीनुसार येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांचे मार्ग अन्यत्र वळवण्यात आले.
येमेनमधील इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील नागरी व ऊर्जा पायाभूत सुविधांना सातत्याने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही प्रमुख सौदी विमानतळांवर हुती बंडखोरांनी क्षेपणास्त्रे डागली होती. लागोपाठ झालेल्या या हल्ल्यांमुळे आखाती प्रदेशात तणाव कमालीचा वाढला आहे.
भारतीय भाविकांच्या सुटकेसाठी केंद्र सक्रिय
विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथील सुरक्षा परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. उड्डाणे रद्द झाल्यामुळे मक्का आणि मदिना येथे अडकलेल्या भारतीय उमराह यात्रेकरूंच्या सुरक्षित परतीसाठी रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
मदत आणि २४x७ नियंत्रण कक्ष भारतीय दूतावास स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने भाविकांना सर्वतोपरी सहाय्य करत असून भाविकांसाठी २४ तास सुरू असणारे विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मदतीसाठी संपर्क क्रमांक : रियाध भारतीय दूतावास दूरध्वनी : +966-554412016, +966-542126784 टोल-फ्री (केवळ सौदीतून) : 8002471234 व्हॉटस्ॲप (केवळ मेसेज) : +966-536216082 जेद्दाह भारतीय वाणिज्य दूतावास : दूरध्वनी : +966-12-2614093, +966-556122301 व्हॉटस्ॲप (केवळ मेसेज) : +966-536209704.