लंडन; वृत्तसंस्था : युरोपातील प्रमुख विमानतळांवर चेक-इन आणि बोर्डिंग सेवा पुरवणार्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याने हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळासह अनेक मोठ्या विमानतळांवर यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने भारतातून लंडनला जाणार्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली असून, विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच वेब चेक-इन पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.
एअर इंडियाने आपल्या सूचनेत म्हटले आहे, हिथ्रो येथे एका थर्ड-पार्टी पॅसेंजर सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे चेक-इन प्रक्रियेत विलंब होऊ शकतो. लंडनमधील आमची ग्राऊंड टीम प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी कार्यरत आहे. आज लंडनहून आमच्यासोबत प्रवास करणार्या प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच वेब चेक-इन पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास सुरळीत होईल.