Crude oil | कच्चे तेल दरही भडकले 
आंतरराष्ट्रीय

Crude oil | कच्चे तेल दरही भडकले

सेन्सेक्स 1,352 अंकांनी कोसळला; रुपयाही घसरला

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाची व्याप्ती वाढल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतील कच्च्या तेलाची वाहतूक थांबली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव 12 टक्क्यांनी वाढून 104 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेले आहेत.

सोमवारी सकाळच्या सत्रात ब्रेंड क्रूड ऑईलचा भाव 25 टक्क्यांनी वाढून 119 ते 120 डॉलर्सवर गेला होता. नंतर हा दर 104 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत खाली आला. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा (डब्ल्यूटीआय) भाव 102 डॉलर्स झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केल्यानंतर तेल दराचा भडका उडाला आहे. फेब्रुवारीअखेरीस कच्च्या तेलाचा प्रतिबॅरल दर 70 डॉलर्सच्या घरात होता. कच्च्या तेलाच्या दरात 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

भारताकडे सध्या 25 कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा आहे. देशाची 7 ते 8 आठवड्यांची इंधनाची गरज यातून पुरविता येऊ शकते. मंगळूर आणि विशाखापट्टणममधील मोक्याच्या भूमिगत गुहांमध्ये, तसेच जमिनीवर आणि किनार्‍यालगतच्या जहाजांमध्ये हे तेल साठविण्यात येते. अमेरिकेसह आखाती देश, रशिया, पश्चिम आफ्रिकेतील 40 देशांतून भारत कच्च्या तेलाची खरेदी करतो.

...म्हणून होर्मुझ महत्त्वाचे

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज 1.7 ते 2.1 कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. जागतिक तेल वाहतुकीतील 20 ते 25 टक्के वाहतूक या प्रदेशातून होते. त्यातील 26 लाख बॅरल तेल दररोज भारताकडे रवाना होते. भारताच्या एकूण गरजेच्या सुमारे 40 टक्के आवक येथून होते. म्हणून ही सामुद्रधुनी महत्त्वाची मानली जाते.

एक डॉलर वाढ जाते हजारो कोटींवर

देशाला लागणार्‍या 85 टक्के तेलाची आयात केली जाते. तेलाच्या किमतीत एक डॉलरने भाववाढ झाली, तर देशाचे आयात बिल सुमारे 16 हजार कोटी रुपयांनी वाढते. त्यामुळे तेल दर स्थिर राहणे भारतासाठी नेहमीच हितावह ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT