US-Israel and Iran War | कच्च्या तेलाचे दर 100 वर; जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव 
आंतरराष्ट्रीय

US-Israel and Iran War | कच्च्या तेलाचे दर 100 वर; जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव

पुढारी वृत्तसेवा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्रेंट क्रूड तेलाचा दर 100 प्रति बॅरलच्या वर गेला असून, काही वेळेस तो 119 पर्यंत पोहोचला. त्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर महागाईचा दबाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे रशियाने 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदाच तेलाचे दर 100 च्या वर गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, इराण-मध्यपूर्व संघर्ष लांबला तर जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

जागतिक तेल बाजारात मोठी उसळी

रविवारी तेलाच्या किमतींमध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. युद्धामुळे ऊर्जा पुरवठा खंडित होण्याची भीती वाढल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. मात्र जी -7 देशांच्या अर्थमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या समन्वयाने तेल साठे बाजारात सोडण्याचा विचार सुरू केला असल्याची बातमी समोर आल्यानंतर किमती थोड्या कमी होऊन सुमारे 110 प्रति बॅरलवर स्थिरावल्या.

होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजवाहतूक ठप्प

इराणने अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजवाहतूक जवळपास थांबवली आहे. या मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के तेल पुरवठा होतो. यामुळे ओपेकमधील प्रमुख उत्पादक देश इराक, संयुक्त अरब अमिराती आणि कुवेत यांनी उत्पादन कमी केले आहे. कारण, बंदरांवर तेलाचा साठा वाढत असून, निर्यात करणे कठीण झाले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, तेलाच्या किंमतीत 10 टक्के वाढ झाल्यास जागतिक महागाई 0.4 टक्क्यांनी वाढते आणि आर्थिक वाढ 0.15 टक्क्यांनी कमी होते.तज्ञांच्या मते, जर तेलाचे दर काही आठवडे उच्च पातळीवर राहिले तर महागाई वाढणे आणि आर्थिक वाढ मंदावणे हे जगासमोर मोठे आव्हान ठरू शकते.

जागतिक शेअर बाजारात घसरण

ऊर्जा दरवाढीच्या भीतीमुळे आशियाई शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

* जपानचा निक्केई 225 निर्देशांक 5 टक्क्यांहून अधिक घसरला.

* दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 6 टक्क्यांनी खाली आला.

* हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 1.35 टक्क्यांनी घसरला.

* युरोप आणि अमेरिकेतील बाजारांमध्येही नकारात्मक वातावरण दिसून आले.

ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांची मालिका

मध्यपूर्वेत ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांची मालिका सुरू आहे. कतार, सौदी अरेबिया आणि कुवेतमधील काही ऊर्जा केंद्रांवर हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरले जात आहे.

इराणचा इशारा : तेल 200 डॉलरपर्यंत जाऊ शकते

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स ने इशारा दिला आहे की, जर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरूच ठेवले तर तेलाचे दर 200 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT