Bangladesh Temple Controversy | बांगला देशात मंदिराजवळ गोमांस शिजवल्याने वाद  Bangladesh Temple Controversy |
आंतरराष्ट्रीय

Bangladesh Beef Controversy | बांगला देशात मंदिराजवळ गोमांस शिजवल्याने वाद

विद्यार्थ्यांची गाय कापून मेजवानीची घोषणा : जगन्‍नाथ विद्यापीठातील धार्मिक तणाव वाढला

पुढारी वृत्तसेवा

ढाका; वृत्तसंस्था : बांगला देशातील जगन्‍नाथ विद्यापीठात मंदिराजवळ गोमांस शिजवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. १२ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती मंदिराजवळ गोमांसाची खिचडी बनवल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने १४ ऑक्टोबर रोजी परिसरात पशुवध टाळण्याचे आवाहन केले. मात्र, या निर्णयाला विरोध करत मुस्लिम विद्यार्थ्यांच्या एका गटाने १६ ऑक्टोबर रोजी गाय कापून मेजवानी आयोजित करण्याची घोषणा केली. वाढता वाद लक्षात घेऊन प्रशासनाने नंतर दुसरे परिपत्रक काढत काही अटींसह अशा कार्यक्रमांना परवानगी असल्याचे स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या इस्लामिक हिस्ट्री अँड कल्चर विभागातील १७ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गोमांसाची खिचडी बनवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या मध्यवर्ती मंदिराजवळ होत असल्याने काही हिंदू विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. प्रकरण वाढल्यानंतर विद्यापीठाच्या प्रॉक्टर डॉ. एम. डी. आजम खान यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर आयोजकांनी मंदिरापासून काही अंतरावर जाऊन स्वयंपाक केला. मंदिराजवळ ठेवलेल्या विटा पुन्हा जागेवर ठेवल्या आणि स्वयंपाकासाठी कँटीनमधून लोखंडी चूल आणली. आयोजकांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे सांगितले. मात्र, त्याच रात्री सनातनी विद्यार्थ्यांनी परिसरात मोर्चा काढला. त्यानंतर सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा वाढली.

प्रशासनाच्या नोटिसीला विद्यार्थ्यांचा विरोध

१४ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि परिसरातील स्वच्छ वातावरण राखण्याच्या कारणास्तव विद्यापीठात पशुवध टाळण्याचे आवाहन केले. नोटिसीत ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनच्या नियमांचाही उल्लेख होता. बांगला देशातील पशुवध आणि मांस गुणवत्ता नियंत्रण कायदा, २०११ नुसार, निर्धारित कत्तलखान्यांबाहेर पशुवध करण्यावर कायदेशीर निर्बंध आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारावास किंवा दंड होऊ शकतो. प्रॉक्टर खान यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात पशुवधाची योजना असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. दुर्गापूजेच्या काळात धार्मिक तणाव वाढू नये, यासाठी विद्यार्थ्यांना कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले होते.

गाय खरेदीसाठी वर्गणी

प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करत विद्यार्थ्यांच्या गटाने गाय कापून मेजवानी आयोजित करण्याचे ठरवले. यासाठी वर्गणी गोळा करून गाय खरेदी करण्यात आली. कार्यक्रमासाठी ७० बांगला देशी टका नोंदणी शुल्क ठेवले होते. आयोजकांनी दुर्गापूजेनंतर कार्यक्रम करण्याचा विचार केला होता. मात्र, नोटीस आल्यानंतर त्यांनी तो शुक्रवारीच आयोजित करण्याचा निर्णय घेतला. गाय कापण्याचा कार्यक्रम मंदिरासमोर न करता कला विभागाच्या इमारतीजवळील मैदानात करण्याचा पर्यायही त्यांनी मांडला.

मंदिर समितीची भूमिका काय?

मंदिर समितीचे सदस्य सचिव जॉय साहा यांनी विद्यापीठ परिसरात गाय कापण्याला समितीचा आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, हा कार्यक्रम मंदिरासमोर होऊ नये आणि धार्मिक उपक्रमांत अडथळा येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. प्रॉक्टर खान यांनीही विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि नव्याने वाद निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT