Alice Huang | डेटा सेंटर्ससाठी अ‍ॅलिस हुआंगशी संबंधित कंपन्यांकडून कोट्यवधींची निधी उभारणी 
आंतरराष्ट्रीय

Alice Huang | डेटा सेंटर्ससाठी अ‍ॅलिस हुआंगशी संबंधित कंपन्यांकडून कोट्यवधींची निधी उभारणी

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग; वृत्तसंस्था : एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत आलेल्या चिनी उद्योगपती अ‍ॅलिस हुआंग यांच्याशी संबंधित कंपन्यांनी चीनमधील मोठ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर्सच्या उपकरणांवर कोट्यवधी डॉलर्सचे कर्ज आणि निधी उभारल्याचे समोर आले आहे. चिनी मध्यवर्ती बँकेच्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड झाली आहे.

या दस्तावेजांनुसार, सुमारे २७० दशलक्ष डॉलर्स किमतीचे ७६४ एआय सर्व्हर्स आणि मॉड्यूल्स, तसेच नेटवर्किंगसाठी लागणारी ३१ दशलक्ष डॉलर्सची उपकरणे तारण ठेवून निधी उभारण्यात आला आहे. यातील बहुतांश हार्डवेअर शांघायमधील एका भव्य डेटा सेंटरमध्ये असल्याचे नोंदवले गेले आहे, जे सुरुवातीला चिनी टेक दिग्गज 'टेन्सेन्ट'च्या भागीदारीतून विकसित केले गेले होते. याकडे अमेरिकन गुप्तचरांचे बारकाईने लक्ष आहे.

अमेरिकन निर्बंध आणि 'मेगास्पीड'वर कारवाई

अमेरिकेने प्रगत प्रोसेसर्सच्या निर्यातीवर निर्बंध घातले असताना अ‍ॅलिस हुआंग यांचे कुटुंब आणि सहकाऱ्यांशी जोडलेल्या कंपन्यांनी चीनच्या एआय उद्योगाला उपकरणे पुरवण्यास मदत केल्याचे यावरून स्पष्ट होते. अ‍ॅलिस हुआंग यांच्या सिंगापूरस्थित 'मेगास्पीड' या कंपनीने चिनी ग्राहकांना प्रतिबंधित एनव्हिडिया तंत्रज्ञान मिळवून दिले का, याचा तपास अमेरिकन अधिकारी करत आहेत. सोमवारीच अमेरिकन वाणिज्य विभागाने 'मेगास्पीड'चा व्यापार काळ्या यादीत समावेश केला आहे. कंपनीने मात्र सर्व आरोप फेटाळले असून, अ‍ॅलिस हुआंग यांनी ऑगस्ट २०२५ मध्येच कंपनी सोडल्याचे म्हटले आहे.

टेन्सेन्टचे स्पष्टीकरण

‘सेंच्युरी लिटोंग’ या एनव्हिडियाच्या भागीदार कंपनीने २०० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या ५१२ सर्व्हर्ससाठी भाडेकरार केले होते. या व्यवहारांमध्ये अ‍ॅलिस हुआंग यांची बहीण हुआंग यू आणि पती कांग वेई यांचा संबंध असलेल्या 'सेंच्युरी लाँगटेंग' आणि 'सेंच्युरी हुआतोंग' या कंपन्यांचा सहभाग दिसून येतो. टेन्सेन्टने या डेटा सेंटरशी किंवा मेगास्पीडशी कोणताही व्यावसायिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्या नावाचा आणि ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर झाल्याचेही टेन्सेन्टने म्हटले आहे. या व्यवहारांतील उपकरणांमध्ये प्रतिबंधित चिप्स होत्या की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT