चीनची आण्विक पाणबुडी बुडाली Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

चीनची आण्विक पाणबुडी बुडाली

arun patil, पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : चीनची नवी आण्विक पाणबुडी वुहानजवळील समुद्रात बुडाली असून, ही घटना लपविण्याचा जोरदार प्रयत्न ‘ड्रॅगन’कडून झाल्याचे समोर आले आहे. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सॅटेलाईट इमेजेसद्वारे उघड झाली आहे. यामुळे चीनच्या लष्करी सामग्री उत्पादनाच्या तंत्रज्ञानातील सुरक्षेबद्दलच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जूनच्या उत्तरार्धात बुडालेली ही पाणबुडी अणुऊर्जेवर चालणारी होती. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. आम्हाला याबद्दल कोणतीही माहिती नाही, असे हा प्रवक्ता म्हणाला. 10 मार्च रोजी मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या उपग्रह प्रतिमेत वुहानजवळील शिपयार्डमध्ये झाऊ श्रेणीतील पाणबुडी दिसली. लांब शेपटीमुळे ती प्रामुख्याने ओळखली जाते. यानंतर 16 मे रोजी प्लॅनेट लॅबच्या सॅटेलाईट इमेजमध्येही ती दिसली. जूनच्या उत्तरार्धात छायाचित्रे घेण्यात आली, तेव्हा ती दिसली नाही. सॅटेलाईट इमेजेसवर संशोधन करणारे टॉम शुगार्ट यांनी सर्वप्रथम ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वसाधारण पाणबुडी बुडाली, असे सुरुवातीला वाटत होते. तथापि, बुडालेली पाणबुडी अणुऊर्जेवर चालणारी होती, हे आम्हाला नंतर समजले. चीनने पाणबुडीबाबत मौन पाळले आहे. अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पाणबुडी कशामुळे बुडाली आणि ती बुडाली तेव्हा त्यात अणुइंधन होते की नाही, हे सांगणे कठीण आहे. या अपघातात जीवितहानी झाली किंवा कसे, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या संरक्षण खात्यातील एका अधिकार्‍याने चीनचे संरक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटले असल्याचा दावा केला.

चीनच्या नौदल विस्तारीकरण मोहिमेला जबरदस्त खीळ

चीनला आपल्या पाणबुड्यांची संख्या 2025 पर्यंत 65 आणि 2035 पर्यंत 80 करायची आहे. या देशाकडे 370 हून अधिक जहाजांसह जगातील सर्वात मोठे नौदल आहे. चीनने आता अणुइंधन जाळणार्‍या नव्या स्वरूपातील पाणबुड्यांचे उत्पादन सुरू केले आहे. मात्र, आण्विक पाणबुडी बुडाल्यामुळे चीनच्या नौदलाच्या विस्तारीकरण मोहिमेला जोरदार खीळ बसल्याचे मानले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT