काठमांडू : पुढारी ऑनलाईन
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे पद आणि त्यांचे सरकार संकटात आहे. ओली हे चीनचे निकटवर्तीय मानले जातात. ओली सरकार वाचविण्यासाठी चीन आपल्या काठमांडूतील दूतावासाच्या माध्यमातून सक्रिय झाला आहे. होऊ यांग की या चीनच्या नेपाळमधील राजदूत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांचीही भेट होऊ यांग की यांनी घेतली आहे.
मे महिन्यातही ओली यांचे सरकार पडेल, अशी चिन्हे होती. तेव्हाही होऊ यांग की यांनी विरोधी गटातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन ओली यांच्या सरकारला आधार दिला होता.
चीन आणि भारतादरम्यान तणाव कायम असतानाच्या काळात चीनला नेपाळमध्ये आपल्या आवडीचे सरकार हवे आहे. म्हणूनच होऊ यांग की जीव तोडून मेहनत घेत आहेत. शुक्रवारी त्या राष्ट्रपतींना भेटल्या.
लगोलग रविवारी माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ यांना भेटल्या.
माधव आणि भंडारी म्हणून खास
भंडारी राष्ट्रपती असल्या, तरी पक्षात त्यांच्या मताला महत्त्व आहे. माधव कुमार हे ओलींचे विरोधक मानले जातात. यांग की या दोन्ही नेत्यांना विश्वासात घेऊन ओलींची खुर्ची वाचवू पाहत आहेत. यांग की यांची या नेत्यांशी झालेली भेट गोपनीयही ठेवली गेली नाही. चीनचा नेपाळच्या राजकारणात वरचष्मा आहे, हे भारताला खुलेआम दाखवून देण्याचाच हेतू यामागे आहे.
मे महिन्यात यांग की या ओलींचे विरोधक पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांना भेटल्या होत्या आणि प्रचंड यांचे मन वळविले होते. यावेळेला परिस्थिती जटिल आहे; कारण नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीतील ४० पैकी ३० सदस्य ओलींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.