बीजिंग : चीनमधील 13 वर्षीय मुलीने भरतनाट्यम सादर करीत इतिहास रचला. भरतनाट्यमच्या लोकप्रिय नृत्यांगना लीला सॅमसन यांच्यासह राजनैतिक अधिकारी आणि चिनी दर्शकांच्या प्रमुख उपस्थितीत लेई मुजी या चिमुकलीने सर्वांची मने जिंकली.
भरतनाट्यममधील अरेंगत्रम या नृत्यकलेचा आविष्कार तिच्या नृत्यामधून पाहायला मिळाला. भारतनाट्यमसारख्या भारताच्या प्राचीन नृत्यकलेचा चीनसह अनेक देशात झपाट्याने प्रसार होत आहे. या नृत्यप्रकारास मोठ्या प्रमाणात लोकमान्यता मिळत आहे. रविवारी रात्री चिनी बालिकेने भरतनाट्यम सादर करीत सर्वांची वाहवा मिळविली. भरतनाट्यम ही अभिजात नृत्य कला आहे. चीनमध्ये या नृत्याविष्काराचे अनेक चाहते आहेत. ही नृत्यकला शिकण्यासाठी चीनमध्ये अख्खे आयुष्य पणाला लावणारे कलाकार पाहायला मिळत आहेत. लेई या चिमुकलीने अरेंगत्रम हा कठीण नृत्यप्रकार आत्मसात केला आहे. चीनमधील भरतनाट्यम नृत्यकलेच्या सोहळ्यात तिने नृत्य सादर केले. अरेंगत्रमची कला आत्मसात केल्यावर भरतनाट्यचे प्रशिक्षण देण्यास अनुमती दिली जाते.
अवघ्या 13 व्या वर्षीच लेई हिने ही कला आत्मसात केली आहे. त्यामुळे तिने या वयात भरतनाट्यमची प्रशिक्षक होण्याची ऐतिहासिक कामगिरीही केली आहे. अरेंगत्रम नृत्यकलेचे चीनमध्येच प्रशिक्षण घेऊन चीनमध्येच ही कला सादर करून मुजीने इतिहास रचल्याची माहिती भारतीय दूतावासातील उच्च्चपदस्थ अधिकारी टी. एस. विवेकानंद यांनी दिली. चीनमधील प्रशिक्षकांकडून तिने भरटनाट्यमचे प्रशिक्षण घेतल्याने भरतनाट्यमसारख्या प्राचीन नृत्याविष्काराला बहर आल्याची प्रतिक्रिया चीनमधील उच्चपदस्थांनी दिली. भरनाट्यममधील विविध अदाकारी सादर करीत चिमुकलीने सर्वांची मने जिंकली. दोन तासाच्या या सोहळ्यात तिने दर्शकांना मंत्रमुग्ध करून सोडले.
चीनमधील भरनाट्यमच्या नृत्यांगना जीन यांनी लेई हिला भरतनाट्यमचे धडे दिले. गेल्या 10 वर्षांपासून तिने ही कला शिकण्यासाठी खडतर प्रशिक्षण घेतले आहे. जीन यांनीही 1999 साली दिल्लीमध्ये भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले होते.