नवी दिल्ली/थिंपू; वृत्तसंस्था : भारताचे सगळे शेजारी आपल्या खिशात घालण्याचा चीनचा डाव आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगला देशनंतर चीनने आता भूतानशी जवळीक वाढवणे सुरू केले आहे. चीनकडून कर्जाच्या आमिषांसह दबावतंत्राचाही वापर भूतानवर केला जात आहे.
परवापरवापर्यंत डोकलाम हा पूर्वी भारत आणि भूतान या दोन देशांतील मुद्दा आहे, असे म्हणणारा भूतान आता चीनही या वादात एक पक्षकार आहे, असे म्हणू लागलेला आहे. भूतानने डोकलामबाबतची ही भूमिका बदलावी म्हणून चिनी कम्युनिस्ट पक्षाचा (सीसीपी) भूतानवर प्रचंड दबाव होता तसेच आहे, असे दिल्ली येथील 'रेड लँटर्न अॅनालिटिका' (आरएलए) या विदेश धोरण विषयातील तज्ज्ञ संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.
डोकलाम वादात चीन हाही एक पक्षकार आहे, असा दावा भूतानचे पंतप्रधान शेरिंग यांनी नुकताच केला होता. गेल्या काही वर्षांत आशियातील अनेक देश चीनच्या कर्ज सापळ्यात अडकलेले आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, मंगोलिया आणि नेपाळ ही त्याची उदाहरणे आहेत. डोकलाम पठाराचा विषय 2017 मध्ये विशेष चर्चेत आला होता. नंतर चिनी सैन्याने डोकलाममधील रस्ता दक्षिणेकडे वाढवण्यास सुरुवात केली. चीन अनेक दशकांपासून भूतानच्या अनेक भागांवर आपला हक्क सांगत आला आहे. कर्ज चुकल्यामुळे श्रीलंकेला हंबनटोटा बंदर प्रकल्प 99 वर्षांसाठी चीनकडे सोपवावा लागला. आता चीनकडून भूतानवर आमिषांचा मारा सुरू आहे, असे 'आरएलए'च्या या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.