पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्याकडून अतिरिक्त आयात शुल्क घेणार्या देशांवरही आम्हीही तेवढाच कर लादणार आहोत. २ एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट करत चिनी वस्तूंच्या आयातीवर २० टक्के कर लावण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेत संयुक्तेतील भाषणावेळी केली. या घोषणेवर चीनने जोरदार पलटवार केला आहे. "टॅरिफ युद्ध असो, व्यापार युद्ध असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे युद्ध असो, अमेरिकेला युद्ध हवे असेल तर आम्ही शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत", अशा शब्दांमध्ये चीनने पलटवार केला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "चीन धमकीला भीक घालत नाही. चीनने केलेल्या करवाढीचा प्रतिहल्ला सहन करणे अमेरिकेसाठी सोपे जाणार नाही. अमेरिकन जनता किमतींमध्ये झालेली मोठी वाढ सहन करण्यास तयार आहे का? असा सवाल तज्ञ करत आहेत."
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरवर प्रत्युत्तर देताना चीनने म्हटले आहे की, "अमेरिकेतील आर्थिक प्रश्नाला अन्य देश जबाबदार नाहीत. अमेरिकन लोकांबद्दल मानवता आणि सद्भावना म्हणून, आम्ही या समस्येवर अमेरिकेला मदत करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आमच्या प्रयत्नांना मान्यता देण्याऐवजी अमेरिकेने चीनला दोष देण्याचा आणि खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. टॅरिफ वाढवून चीनवर दबाव आणण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. ते आम्हाला मदत केल्याबद्दल शिक्षा करत आहेत. यामुळे अमेरिकेची समस्या सुटणार नाही. त्याऐवजी परस्पर संवाद आणि सहकार्य कमकुवत होईल." असा इशाराही चीनने दिला आहे.
आम्ही धमक्यांना घाबरत नाही. दबाव, जबरदस्ती किंवा धमकावणे हा चीनशी व्यवहार करण्याचा योग्य मार्ग नाही. चीनवर जास्तीत जास्त दबाव आणणारा कोणीही चुकीचा देश निवडत आहे. जर अमेरिकेला खरोखरच आयात शुल्क प्रश्न सोडवायचा असेल, तर योग्य मार्ग म्हणजे एकमेकांशी समानतेने वागून चीनशी सल्लामसलत करणे हितावह असल्याचा सल्लाही चीनने अमेरिकेला दिला आहे.
ट्रम्प यांनी आज जाहीर केले की, " ते ( अन्य देश ) आमच्यावर कोणताही 'कर' लावतील, आम्ही त्यांच्यावर परत कर लावू. जर त्यांनी आम्हाला त्यांच्या बाजारपेठेपासून दूर ठेवण्यासाठी गैरशुल्क लादले, तर आम्ही त्यांना आमच्या बाजारपेठेपासून दूर ठेवण्यासाठी गैरशुल्कांचा अडथळा उभा करु."