China mosquito drone spy Surveillance Insect-sized drone espionage Bio-weapon Password stealing drone privacy threat Cybersecurity threat
बीजिंग : चीनने अलीकडे एक अतिशय लहान, मच्छरासारखा ड्रोन समोर आणला असून, तो गुप्त हेरगिरीसाठी किंवा धोकादायक मोहिमांसाठी वापरला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ड्रोनमुळे सायबर सुरक्षेवर, वैयक्तिक गोपनीयतेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर धोका निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘द सन’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या ड्रोनचे दोन पानांसारखे पिवळसर पंख असून, त्याचा शरीराचा भाग काळा आणि अत्यंत बारीक आहे. त्याला तीन तारांसारख्या पायांद्वारे आधार दिला आहे. हा ड्रोन इतका लहान आणि शांत आहे.
आकार: हा ड्रोन केवळ 0.6 सेंटीमीटर एवढा छोटा आहे – म्हणजे तुमच्या बोटाच्या नखापेक्षा ही लहान!
रचना: पानांसारखे पिवळसर पंख, काळसर सडपातळ शरीर आणि तीन तारासारखे पाय अशी याची रचना असून हा खरा मच्छर वाटावा इतका हुबेहूब बनवण्यात आला आहे.
कॅमेरा व मायक्रोफोन: यामध्ये सूक्ष्म कॅमेरा आणि मायक्रोफोन लावलेले असून, याचा उपयोग माहिती गोळा करण्यासाठी केला जाऊ शकतो.
रडारप्रूफ: हा ड्रोन इतका शांतपणे उडतो की तो रडारला सुद्धा पकडता येत नाही. त्यामुळे बंदिस्त किंवा सुरक्षित भागांमध्ये तो सहज प्रवेश करु शकतो.
मर्यादित उड्डाण क्षमता: आकाराने छोटा असल्यामुळे याचा बॅटरी बॅकअप खूप कमी आहे. लांब मिशनसाठी अनेक ड्रोन लागू शकतात.
हे ड्रोन मोकळ्या रणांगणासाठी नाहीत, परंतु घरात, कार्यालयात किंवा लपून माहिती काढण्यासाठी उपयुक्त.
चीनच्या सरकारी माध्यमांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये काही शास्त्रज्ञ हा सूक्ष्म ड्रोन हातात धरलेला दिसतात. त्यांच्या मते, हा ड्रोन लष्करी तसेच नागरी कार्यांसाठी वापरला जाईल.
मात्र, याच्या संभाव्य वापरांमुळे अनेक तज्ज्ञांनी गंभीर इशारे दिले आहेत. चीनच्या CCTV-7 (लष्करी चॅनेल) वर या ड्रोनचा व्हिडिओ दाखवण्यात आला.
चीन सध्या सूक्ष्म ड्रोन, स्वार्म ड्रोन्स आणि अज्ञात हल्ले करणाऱ्या तंत्रज्ञानात अग्रेसर आहे. या शोधामुळे अनेक देश आपली सुरक्षा व्यवस्था अद्ययावत करण्याकडे वळले आहेत.
अमेरिकेतील संरक्षण विश्लेषक टिमोथी हीथ यांच्या मते, हा ड्रोन सायबर गुन्हेगारांकडून वापरला गेला तर तो पासवर्डसारखी संवेदनशील माहिती चोरू शकतो.
तर, गुगलची माजी कर्मचारी फ्यूचरिस्ट ट्रेसी फॉलोज यांनी इशारा दिला आहे की, हे ड्रोन भविष्यात जीवघेण्या विषाणूंनी सुसज्ज केले जाऊ शकतात आणि ते स्वयंचलित पद्धतीने कार्य करू शकतात – ज्यामुळे धोका आणखी वाढतो.
सुरक्षा तज्ज्ञांनी सूचित केलं की, हे ड्रोन घरामध्ये घुसून तुमचे संभाषण ऐकू शकतात, तुमच्या हालचाली ट्रॅक करू शकतात आणि वैयक्तिक डेटावर हल्ला करू शकतात.
या ड्रोनची तुलना नेटफ्लिक्सवरील 'ब्लॅक मिरर' मालिकेतील 'Hated in the Nation' या भागाशी केली जात आहे.
या भागात कृत्रिम मधमाशा ज्या सुरुवातीला परागसिंचनासाठी तयार केल्या गेल्या होत्या, त्या नंतर हॅक करून हत्येसाठी शस्त्र म्हणून कशा वापरल्या जाऊ शकतात, याचे चित्रण केले आहे.
हा मच्छरासारखा ड्रोन किती उपयोगी ठरतो हे येणारा काळच सांगू शकेल. पण सध्या तरी तज्ज्ञांची चिंता पाहता, तो ‘ड्रोन’पेक्षा ‘धोकादायक हत्यार’ म्हणून पुढे येण्याचीच शक्यता अधिक असल्याचे चित्र दिसते.
नागरी आणि लष्करी वापराच्या आडून हेरगिरी, जैविक हल्ला आणि सायबर गुन्हेगारीसारख्या गंभीर धोके यामागे लपलेले आहेत.