पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवस अमेरिका आणि चीन यांच्या आयात शुल्कावरुन सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. अमेरिकेशी 'टॅरिफ वॉर' सुरु असतानाच अमेरिकेबरोबर व्यापार करार करुन आमचे आर्थिक नुकसान करणार्या देशांवर सडेतोड कारवाई केली जाईल, अशी धमकीच चीनने अन्य देशांना दिली आहे.
अमेरिका आपले भागीदार असणार्या देशांना चीनसोबतचा आर्थिक संबंध कमी करण्यासाठी दबाव आणण्याची योजना आखत असल्याचे वृत्त 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिले होते. यावर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी म्हटले की, चर्चेच्या माध्यमातून अमेरिकेशी आर्थिक आणि व्यापारी मतभेद सोडवण्याच्या इतर देशांच्या अधिकाराचा चीन आदर करतो;पण अमेरिकेसोबत इतर देशांच्या व्यापार करारांचा चीनवर वाईट परिणाम झाला तर आम्ही अशा प्रकारच्या व्यापार कराराला तीव्र विरोध करु. चीनचे नुकसान करणारा कोणताही व्यापार करार कधीही स्वीकारणार नाही. त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. अल्पकालीन फायद्यांसाठी निर्णय घेतल्याास सर्व संबंधितांना नुकसान होईल, असा इशाराही चीनने दिला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवर १० टक्के कर लादला आहे. तर चीनवर १४५ टक्क्यांपर्यंतचा कर असेल अशी घोषणा केली. चीननेही याला उत्तर देत अमेरिकेवर १२५ टक्क्यांपर्यंतचे कर लादला. जागतिक व्यापार संघटनेकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येण्याचे आवाहन करताना आपले हक्क आणि हितसंबंधांचे रक्षण करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे. एकदा आंतरराष्ट्रीय व्यापार जंगलाच्या कायद्याकडे परतला की, सर्व राष्ट्रे बळी पडतील, असा इशाराही दिला आहे.