आंतरराष्ट्रीय

आमचा मार्ग आम्ही ठरवू; बांगलादेशचे चीनला प्रत्युत्तर

Pudhari News

बीजिंग/ढाका : वृत्तसंस्था 

छोट्या देशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करताना चीन अनेकदा लालूच दाखवतो, तर काहीवेळा धाकदटपशा दाखवतो. अशीच एक धमकी चीनने भारताचा शेजारी बांगलादेशला दिली आहे; मात्र बांगलादेश सरकारनेही ड्रॅगनला आम्ही आमचे निर्णय घेण्यास सक्षम आहोत, असे निडरपणे सुनावले आहे. 

चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंग यांनी नुकताच बांगलादेशचा दौरा केला. त्यांनी पंतप्रधान शेख हसीना आणि लष्करप्रमुखांशी चर्चा केली. मंगळवारी चिनी राजदूत ली जिमिंग म्हणाले की, बांगलादेशसाठी आमचा संदेश स्पष्ट आहे. चीनविरोधात बनलेल्या कुठल्याही गटात बांगलादेशने असता कामा नये. असे झाले तर त्याचे गंभीर नुकसान होईल. 

बांगलादेश जर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश असलेल्या 'क्वॉड' संघटनेत सहभागी झाला, तर त्याचे मोठे परिणाम बांगलादेशला भोगावे लागतील. त्यावर बांगलादेशनेही मोजक्या शब्दांत चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन म्हणाले की, आम्ही कुठल्याही गटात सहभागी नाही. आम्ही आमचे परराष्ट्र धोरण संतुलित ठेवतो आणि कुणीही आम्हाला शिकवू नये. आमचा देश स्वतंत्र आहे. आमचे धोरण आम्ही स्वतः ठरवू. चीनचे राजदूत त्यांचे म्हणणे मांडू शकतात. आही क्वॉडमध्ये सहभागी होऊ नये, असे त्यांना वाटत असेल, पण आम्ही अद्याप कुठल्याही संघटनेमध्ये सहभागी होण्याबाबत कुणाशीही संपर्क साधलेला नाही, तरीदेखील चीन इतक्यातच प्रतिक्रिया का देत आहे? 

 भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा सहभाग असलेल्या क्वॉड या संघटनेची स्थापना 2007 मध्ये व्यापार आणि सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून झाली. पण नंतरच्या काळात हे चारही देश चीनविरोधात एकत्र आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT