China space mice
बीजिंग: चीनच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, जीवशास्त्र प्रयोगांसाठी अंतराळात पाठवण्यात आलेले चार उंदीर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. शुक्रवारी चीनच्या स्पेस स्टेशनमधून 'शेनझो-२१' अंतराळयानाच्या माध्यमातून हे नमुने परत आले आणि शनिवारी पहाटे ते चिनी वैज्ञानिकांकडे पुढील संशोधनासाठी सुपूर्द करण्यात आले.
चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेस ने दिलेल्या माहितीनुसार, परत आलेल्या नमुन्यांची ही नववी तुकडी असून, यात २६ प्रायोगिक प्रकल्पांचे नमुने समाविष्ट आहेत. नमुन्यांचे एकूण वजन सुमारे ४६.६७ किलोग्राम आहे.
जीवांचे अंतराळ वातावरणाशी असलेले अनुकूलन आणि ताण प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी हे चार उंदीर महत्त्वाचे आहेत. लँडिंगनंतर तातडीने या उंदरांची जागेवर तपासणी करण्यात आली. संशोधक आता त्यांच्या वर्तनाचे तसेच प्रमुख शारीरिक आणि जैवरासायनिक निर्देशकांचे परीक्षण करतील. या अभ्यासातून अंतराळात सजीवांवर होणाऱ्या परिणामांबद्दल महत्त्वपूर्ण वैज्ञानिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
उंदरांव्यतिरिक्त, झेब्राफिश, हॉर्नवर्ट, प्लॅनेरियन्स आणि ब्रेन ऑर्गनोइड्स यांसारखे जीवशास्त्राचे इतर नमुने शनिवारी पहाटे बीजिंगमधील CAS च्या स्पेस ॲप्लिकेशन इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये पोहोचवण्यात आले. येथे नमुन्यांची स्थिती तपासली जाईल आणि नंतर ते वैज्ञानिकांना पुढील संशोधनासाठी दिले जातील.
वैज्ञानिक परत आलेल्या जीवशास्त्र पेशी नमुन्यांवर 'प्रोटीओमिक्स' आणि 'ट्रान्स्क्रिप्टोमिक सिक्वेन्सिंग' सारख्या अत्याधुनिक चाचण्या करतील. सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणामुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम अभ्यासून, संबंधित आजारांवर प्रतिबंध आणि उपचारांसाठी नवे मार्ग शोधले जातील. गुरुत्वाकर्षणामुळे वाढीवर कसा परिणाम होतो, तसेच अंतराळात कार्यक्षमता कशी असते, याचा अभ्यास होईल. या संशोधनाचे निष्कर्ष भविष्यातील उपग्रहासाठी अत्यंत महत्त्वाचा आधार ठरतील.