बीजिंग : येथील नॅशनल स्पीड स्केटिंग ओव्हल येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘वर्ल्ड ह्युमनॉईड रोबोट गेम्स २०२६’दरम्यान टुवर्डस ह्यूमन लेव्हल होल बॉडी रिक्रिएशन प्रणालीसह युनिट्रीचे ह्युमनॉईड रोबोटस्‌ दोरीखेच स्पर्धेत भाग घेताना. 
आंतरराष्ट्रीय

Humanoid Robots | चिनी सैन्यात ह्युमनॉईड रोबोटस्‌ भरती करणार

युद्धासाठी नवी व्यूहरचना

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग; वृत्तसंस्था : युद्धात जीवितहानी कमी करण्यासाठी ह्युमनॉईड रोबोटस्‌ दाखल करण्याच्या हालचाली चिनी लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये सुरू आहेत. त्यासाठी शास्त्रज्ञांना लष्करी गरजेनुसार रोबो बनवण्याचे आव्हान पारा पाडावे लागणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्नांना वेग देण्यात येत असून गेल्या वर्षभरात जगात सर्वाधिक रोबोची निर्मिती चीनमध्ये करण्यात आली हे विशेष.

बीजिंगमध्ये गेल्या महिन्यात पार पडलेल्या ‘वर्ल्ड ह्युमनॉईड रोबो गेम्स'मध्ये मानवरूपी रोबोटस्‌नी धावणे, बॉक्सिंग आणि नृत्यामध्ये आपली क्षमता दाखवली. काही रोबोटस्‌ तर धावपटू उसेन बोल्टपेक्षाही वेगाने धावले. मात्र, या कार्यक्रमानंतर अवघ्या दोन दिवसांत चिनी सैन्याचे मुखपत्र असलेल्या ‘पीएलए डेली’ने शास्त्रज्ञांना महत्त्वाचे आवाहन केले. रोबोटिक्सचे अद्ययावत तंत्रज्ञान केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता ते थेट लष्करी प्रशिक्षण मैदानात ‘रोबो लढाऊ’ म्हणून विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले.

चीनचे संरक्षण क्षेत्र युद्धात मानवरूपी रोबोटस्‌च्या वापरासाठी जोरदार तयारी करत असल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे. चिनी सैन्याची खरेदी निविदा पत्रके, पेटंटस्‌ आणि शैक्षणिक अहवालांनुसार, २०२५ आणि २०२६ मध्ये रोबोटस्‌ची आकलनात्मक क्षमता, हालचाली आणि डेटा प्रशिक्षणावर प्रचंड भर दिला गेला. अमेरिकेच्या बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्चनुसार, जगातील ९५ टक्के ह्युमनॉईडस्‌ चीन बनवतो. या औद्योगिक वर्चस्वाचा थेट फायदा पीएलए उचलत आहे.

शहरी युद्धासाठी विशेष पथके

‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी’च्या २०२५ मधील एका संशोधनात नागरी वस्त्यांमधील युद्धाची योजना मांडण्यात आली आहे. त्यानुसार शत्रूच्या ताब्यातील इमारती एकामागून एक रिकाम्या करण्यासाठी मानवरूपी रोबोटस्‌, रोबो डॉग्स आणि मानवरहित वाहनांची पथके पायदळासोबत काम करतील. रोबोटस्‌चे हात आणि पाय असल्याने ते शिड्या चढणे, बोगदे पार करणे आणि दरवाजा उघडणे यांसारखी कामे सहज करू शकतात.

रिमोट ऑपरेशन व जागतिक स्पर्धा

चीनच्या ‘नोरिन्को’ या सरकारी कंपनीने ‘फुक्सी’ नावाचा पूर्ण आकाराचा ह्युमनॉईड तयार केला असून तो पहारा देणे व टेहळणीसाठी सक्षम आहे. याला रिमोट कंट्रोलने मानवी ऑपरेटरद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. केवळ चीनच नव्हे, तर अमेरिकन लष्करानेही अशा रोबोटस्‌साठी स्पर्धा सुरू केली आहे.

१) प्रयोगशाळेतून रणांगणाकडे : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने मानवरूपी रोबोटस्‌ना (ह्युमनॉईडस्‌) थेट युद्धभूमीत उतरवण्याच्या संशोधनाला गती दिली आहे.

२) जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व : २०२५ च्या आकडेवारीनुसार जगातील सुमारे ९५ टक्के ह्युमनॉईडस्‌चे उत्पादन एकट्या चीनमध्ये झाले असून याचा फायदा चिनी सैन्याला मिळत आहे.

३) शहरी युद्धाची रणनीती : इमारती आणि बोगद्यांमधील मोहिमांसाठी मानवरूपी रोबोटस्‌चा सैनिकांसोबत ‘कॉम्बॅट फोर्स’ म्हणून वापर करण्याचा चीनचा आराखडा आहे.

४) नैतिक आणि तांत्रिक आव्हाने : बॅटरीची मर्यादित क्षमता आणि युद्धाच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन यांसारख्या आव्हानांमुळे या रोबोटस्‌च्या प्रत्यक्ष तैनातीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

युद्धभूमीवर येणार मर्यादा

तज्ज्ञांच्या मते प्रत्यक्ष युद्धभूमीत धूळ, चिखल आणि अनपेक्षित परिस्थितीमुळे रोबोटस्‌ची कार्यक्षमता मर्यादित ठरू शकते. शिवाय आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांनुसार सामान्य नागरिक आणि शत्रू सैनिक यातील फरक ओळखण्याचे नैतिक आव्हानही कायम आहे. तरीही पुढील ५ ते १० वर्षांत हे रोबोटस्‌ रणांगणावर मोठ्या संख्येने तैनात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT