पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या जगभरातील देशांवर टॅरिफ लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनने देखील अमेरिकेवर अतिरिक्त कर लागू केला आहे. तशी घोषणा चीनच्या वित्त मंत्रालयाने केली. त्यानुसार 10 एप्रिलपासून आता अमेरिकेच्या सर्व वस्तुंवर 34 टक्के अतिरिक्त कर वसुल केला जाणार आहे.
चीनने अमेरिकेला नवीन शुल्क वाढ (टॅरिफ) मागे घेण्याची विनंती केली होती. तथापि, अमेरिका टॅरिफवर ठाम राहिल्यानतंर चीननेदेखील स्वतःच्या हिताच्या रक्षणासाठी प्रत्युत्तरात्मक उपाययोजना करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एक दिवसांतच चीनने या कराची घोषणा केली आहे.
चीनने यापूर्वीच स्वतःच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी प्रत्युत्तरात्मक उपाययोजना राबविण्याची शपथ घेतली होती. चीनच्या वित्त मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले की, ते 10 एप्रिलपासून सर्व अमेरिकन वस्तूंवर 34% अतिरिक्त कर लावणार आहेत, ज्याचा उद्देश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापक करांवर प्रतिकार करणे आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, "जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव व्यापारी युद्धात रुपांतर होण्याची शक्यता आहे. आम्ही दृढपणे याचा विरोध करतो. स्वतःच्या अधिकारांचे आणि हिताचे रक्षा करण्यासाठी प्रत्युत्तरात्मक उपाय केले जातील.