बीजिंग; पीटीआय : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने रशियाच्या समर्थनासाठी चीनवर 50 ते 100 टक्के कडक टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर चीनने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने आपल्या नाटो सहयोगींना देखील चीनवर मोठ्या आर्थिक निर्बंध लावण्याचे आवाहन केले होते.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी स्लोव्हेनियाच्या उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री तान्या फयोन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ल्जुब्लियाना येथे बोलताना म्हटले, चीन युद्धात सहभागी होत नाही किंवा युद्धाचे नियोजन करत नाही. आम्ही संवादाच्या माध्यमातून शांतता आणि राजकीय तोडगा काढण्याच्या मार्गाला प्राधान्य देतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या गोंधळ आणि संघर्षाचा काळ आहे. अशा वेळी चीन आणि युरोप हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून मित्र असावेत. एकत्र येत सहकार्य करावे, संघर्ष टाळावा आणि जागतिक प्रक्रियांना बळ द्यावे, हे दोन्ही बाजूंचे कर्तव्य आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या उद्दिष्टांनाही पाठिंबा देत बहुपक्षीयता आणि आंतरराष्ट्रीय संवादाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.