नवी दिल्ली/बीजिंग; वृत्तसंस्था : भारत - चीन - रशिया आदी देशांच्या ब्रिक्स या संघटनेची परिषद रशियाच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. 22 पासून सुरू होत आहे. परिषदेच्या पूर्वसंध्येलाच लडाखमधील सीमावादावर भारत-चीनदरम्यान तोडगा द़ृष्टिपथात आलेला आहे. लडाखला लागून असलेल्या सीमेवरून चीन आपले सैन्य माघारी घ्यायला तयार झाला आहे. लडाखमध्ये गस्त घालण्याच्या दोन्ही पक्षांना मंजूर असलेल्या नव्या पद्धतीलाही चीन तयार झाला आहे.
लवकरच ‘एलएसी’वरून दोन्ही देश आपले सैन्य हटवतील, असे संकेत मिळाले आहेत. गलवान धुमश्चक्रीसारखा संघर्ष भविष्यात घडू नये, यावरही दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली. सैन्य हटवले तर असे घडणार नाही, ही भारताची भूमिका चीनने मान्य केली. 2020 मध्ये गलवान धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंच्या लष्कराची मोठी जीवित हानी झाली होती. भारताचे 20 जवान शहीद झाले होते; तर 60 चिनी सैनिकांचा खात्मा झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स परिषदेला सहभागी होत आहेत. तत्पूर्वीच भारत-चीनदरम्यान हा मोठा समझोता झाल्याने मॉस्कोतील पंतप्रधान मोदी व चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची संभाव्य भेटही तणावरहित असेल, असे आंतरराष्ट्रीय वर्तुळातून मानले जाते.
1) पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांतील सीमावाद संपुष्टात येणे शक्य आहे.
2) देप्सांग, डेमचोकमधील काही गस्ती ठिकाणांवर भारतीय जवानांना सध्या जाता येत नाही.
3) इथे दोन्ही बाजूंचे सैन्य उपस्थित आहे. गस्तीची नवी पद्धत या विषयाशी संबंधित आहे.
4) माघारीमुळे गस्तीची नवी पद्धत अवलंबली जाईल आणि सीमेलगत दोन्ही सैन्यांत संघर्ष उद्भवण्याची शक्यताही कमी झाली आहे.