बीजिंग; वृत्तसंस्था : जगभरातील प्रज्ञावंतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चीनने के-व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या एच-1 बी व्हिसाला पर्याय असे त्याचे वर्णन केले जात असून, हा नवा व्हिसा 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल.
‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या मते, विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांतील प्रतिभावंतांसाठी के-व्हिसा लाभदायी आहे. प्रसिद्ध विद्यापीठातून किंवा संशोधन संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेल्यांनाही याचा लाभ घेता येईल. चीन सरकारने ऑगस्टमध्ये या निर्णयाला मान्यता दिली. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी गेल्या महिन्यात परदेशी तरुणांच्या देशात प्रवेश आणि निर्गमनाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले होते.
चीन 12 प्रकारचे व्हिसा जारी करतो. सध्या, चीनमध्ये काम करण्यासाठी आर-व्हिसा आणि झेड-व्हिसा वापरले जातात. झेड-व्हिसा एका वर्षासाठी वैध असून, आर-व्हिसा 180 दिवसांच्या वास्तव्यास परवानगी देतो. आर-व्हिसासाठी कोणतेही शुल्क नसली तरी त्याची अर्ज प्रक्रिया किचकट आहे.